मुंबईत शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबईत शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठीची अधिसूचना दिनांक 26 एप्रिल रोजी जारी होणार आहे. या मुंबई उपनगरांतील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरवात होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी पूर्णत्वास आली आहे. अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज भरण्यास 26 एप्रिल पासून सुरवात होणार असून 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 4 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 6 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 मे रोजी मतदान होईल, तर 4 जून रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी एका केंद्रांचे संपूर्ण संचलन महिला कर्मचारी, एका मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन तरुण अधिकारी आणि तिसर्‍या मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन दिव्यांग कर्मचारी करतील. मतदान केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 7 हजार 879 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 39 लाख 82 हजार 590, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 24 हजार 477 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 812 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 15 हजार 958, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 174 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकार्‍याने प्रमाणपत्र दिलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्याकडून पर्याय भरुन घेण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news