शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. (farmer protest chalo delhi) पंरतु, अद्याप सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागणीवर योग्य ती पावले उचलण्यात आलेली नाहीत. सरकार-शेतकऱ्यादरम्यान संवाद देखील बंद आहे. अशात आंदोलन अधिक आक्रमण करण्याच्या पवित्र्यात शेतकरी असल्याची माहिती समोर आली आहे. (farmer protest chalo delhi)
संयुक्त किसान मोर्चाकडून 'चलो दिल्ली'ची हाक देण्यात आली आहे. देशभरातील शेतकर्यांना या काळा कायद्याविरोधात ऑक्टोबर अखेर पर्यंत राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशात केंद्राच्या निषेधार्थ अधिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या मनस्थितीत शेतकरी नेते असल्याचे बोलले जात आहे.
दिवाळी सण सर्वत्र चैतन्याचा,सुख,समृद्धी, भरभराट घेवून येणारा असतो.पंरतु, हे काळे कायदे लादून सरकारने शेतकऱ्यांवर आयुष्यभराचे 'दिवाळे' लादले आहे. अशात सरकार विरोधात 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाकडून घेण्यात आला आहे,अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी दैनिक पुढारी सोबत बोलतांना दिली.
शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आंदोलनाच्या सुरूवातीपासून शेतकरी गटागटाने येतात. नियमित चालणारी प्रक्रिया आहे. सरकार विरोधात 'काळी दिवाळी' साजरी करण्यासाठीच शेतकर्यांना दिल्लीच्या सीमेवर एकत्रित होण्याचे आवाहन केले आहे.
२७ ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी एकत्रित यावे, अशा सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.आंदोलनाच्या अनुषंगाने येत्या काळात मोठा निर्णय होण्याची शक्यता देखील गिड्ड-पाटील यांनी वर्तवली. निहंग शीख आंदोलकांसंबंधी संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणाले की, निहंग शीख हे आंदोलनाला समर्थन देणारा एक वर्ग होता.
आंदोलन अद्यापही कणखररित्या सुरू आहे.आंदोलन संपुष्टात येणार असल्याच्या काही अफवा पेरल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. परंतु, आंदोलन पुढेही ते याच उर्जेने सुरू राहील; असा विश्वास त्यांनी वर्तवला.