कोणत्याही देशातील ज्येष्ठ नागरिकांची म्हणजे 65 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या वाढल्याने बचतीत घट होते, श्रमशक्ती कमी होते आणि गुंतवणुकीचा दरही कमी होतो. यानुसार सध्या युरोपातील ज्येष्ठांची संख्या एवढी वाढली आहे की, तेथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात आर्थिक आणि सामाजिक समस्यांचे प्रमाण अधिक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, युरोपात 2024 मध्ये 65 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या पंधरा वर्षांच्या तरुणांपेक्षा अधिक असणार आहे. 2022 मध्ये युरोपीय संघाच्या देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 21.1 टक्के होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सध्याच्या नकारात्मक स्थितीचा मुकाबला करण्यासाठी युरोपीय लोकांना आपल्या जीवनशैलीत आणि सवयीत बदल करावा लागणार आहे. आयुर्मान वाढल्याने युरोपात ज्येष्ठांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे जन्मदर मात्र कमी होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, युरोप आणि काही देशांत ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
ज्येष्ठांनी दररोज अधिकाधिक वेळ खेळण्यात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात व्यतीत करणे अपेक्षित आहे. दर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करावा लागेल आणि तरच ते आरोग्यदायी राहतील. या आधारावर आरोग्यावरचा खर्च कमी राहील. याप्रमाणे ते आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीत सक्रिय सहभाग घेऊ शकतील. शारीरिकरूपातून सक्रिय राहिल्याने मृत्यूची शक्यता 35 टक्के कमी राहू शकते. ज्येष्ठांची संख्या वाढल्याने युरोपीय देशांत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर बदल दिसत आहेत. उदा. तरुण लोकसंख्या कमी झाल्याने कामकाजाच्या ठिकाणी क्रयशक्ती कमी झाली आणि उत्पादकता घसरली. आर्थिक घडामोडी कमी झाल्याने आणि आरोग्यावर अधिक खर्च होऊ लागल्याने अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.
युरोपशिवाय जपानमध्येही ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या ही चिंता वाढविणारी आहे. जपानमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठांची संख्या ही 92 हजारांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेतदेखील असाच प्रश्न आहे. आयुर्मान चांगले असणे, कमी जन्मदर, आरोग्यावरील वाढता खर्च यांसारख्या गोष्टींचा अमेरिका सामना करत आहे कारण सार्वजनिक आरोग्यावरच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी कामगारांची संख्या रोडावली असून, मनुष्यबळासाठी दुसर्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. मुले, तरुण यांच्यात वाढता एकाकीपणा आणि नैराश्य दिसत आहे.
लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी एक मुलगा धोरण अंगीकारणार्या चीनमध्ये तरुणांची संख्या घसरली आहे. त्याचवेळी ज्येष्ठांची संख्या वाढली आहे. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या मते, पुढच्या शतकात चीनमध्ये मनुष्यबळ केवळ 54.8 कोटी राहील. त्याचा परिणाम म्हणजे कामगारांची संख्या कमी झाल्याने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात, भारत या समस्येपासून दूर राहिला आहे. भारतात 2011 मध्ये ज्येष्ठांची संख्या 5.5 टक्के होती. ती 2050 पर्यंत वाढत 15.2 टक्के होईल. त्याचवेळी 2050 मध्ये चीनमध्ये ज्येष्ठांची संख्या 32.6 आणि अमेरिकेत 23.2 टक्के राहील. 2050 पर्यंत भारतातील दक्षिण राज्य आंध— प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या एकूण लोकसंख्येचा पाचवा भाग हा ज्येष्ठांचा राहील; तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, बिहार, हरियाणा राज्यांत 2050 मध्ये तरुणांची संख्या अधिक राहील आणि त्यामुळे या राज्यांतून दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर सुरू राहील. या बदलामुळे दक्षिण राज्यांच्या पायाभूत सुविधांवर ताण वाढू शकतो. त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्त युरोपीय देश, जपान, चीन अणि अमेरिकेला बदलत्या काळानुसार नवीन धोरण तयार करणे आणि त्यावर ठोस अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.