मविआ सरकार फडणवीस, दरेकर, शेलारांना अटक करणार होते : एकनाथ शिंदे यांचा दावा

मविआ सरकार फडणवीस, दरेकर, शेलारांना अटक करणार होते : एकनाथ शिंदे यांचा दावा
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री आशिष शेलार आणि विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या अटकेची योजना आखण्यात आली होती, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फडणवीस, महाजन, शेलार व दरेकरांविरोधात प्रकरणे तयार करायची व त्यांना अटक करायची योजना महाविकास आघाडीने आखली होती. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे काही आमदार फोडण्याचा कटही आखण्यात आला होता.

मुख्यमंत्री ठाकरेंनाच व्हायचे होते

महाविकास आघाडी सरकार बनत असताना मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्याकडे काही माणसे पाठवून आपले नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवायला सांगितले, असेही शिंदे या मुलाखतीत म्हणाले. 'मुख्यमंत्री तुम्हीच व्हा',

मविआ सरकार फडणवीस, दरेकर, शेलारांना अटक करणार होते असे पवारांनी उद्धव ठाकरेंना कधीच म्हटलेले नव्हते. स्वतः शरद पवारांनी मला हे सांगितले. शेवटी उद्धव ठाकरे पवार साहेब म्हणतायत, असे सांगत स्वतः मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांसारखे किंगमेकर व्हायचे सोडून उद्धव ठाकरे स्वतःच किंग झाले, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप

शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी सतत आपला अपमानच केला असा आरोप करत मुख्यमंत्री म्हणतात, माझे नगरविकास खातेही काढून घेण्याचा त्यांचा विचार होता. माझ्या खात्यात आदित्य ठाकरेंचा खूप हस्तक्षेप व्हायचा. सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. मुंबईच्या नगर नियोजनावर तर माझे काही नियंत्रणच नव्हते.
भाजपसोबत जाण्यास ठाकरे राजी झाले होते

महाविकास आघाडी स्थापन न करता आपणच एकत्र येऊ म्हणून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पन्नास वेळा फोन केला. पण तो उचलला गेला नाही. आपण पुन्हा भाजपबरोबर जाऊ, असे उद्धव ठाकरेंना मी वारंवार सांगितले. उद्धव ठाकरे होसुद्धा म्हणाले. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावरसुद्धा ते भाजपसोबत जाण्याला होकार देत होते. त्यांची दिल्लीत मोदींची भेट झाली, त्यावेळीही त्यांनी तयारी दाखवली होती आणि मोदींनी यासाठी आठ दिवस दिले होते. पण निर्णय घेण्याऐवजी भाजपचेच 12 आमदार निलंबित केले गेले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तेव्हा उशीर झाला होता

मी सुरतला जाताना वसईतल्या एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पण वेळ निघून गेलीय, असे मी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करून आपण पुन्हा एकत्र येऊ, एकनाथ शिंदेंसोबत का जाताय असे म्हटले, असे शिंदे यांनी सांगितले.

आदित्यला मुख्यमंत्री बनविण्याची घाई

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची उद्धव ठाकरेंना खूप घाई झाली होती. मी त्यात अडथळा आहे असे त्यांना वाटत होते, असेही शिंदे म्हणाले. फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून स्वतः दिल्लीच्या राजकारणात जाण्याची तयारी केली होती, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे बोलत होते.

शिवसेना 19 जागा लढवणार

महायुतीचे जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नसले तरी शिवसेना लोकसभेच्या 19 जागा लढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेना महाराष्ट्रात 16 आणि मुंबईत 3 जागांवर लढत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रथमच दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news