मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेने केलेल्या खिचडी वितरणात कथित अनियमितते प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना चाैकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले आहे. कथित खिचडी घोटाळ्यातील काही रक्कम संदीप राऊत यांच्या खात्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत परप्रांतियांना कोरोना महामारीच्या काळात तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. मुंबई महानगर पालिकेने ५२ कंपन्यांना हे कंत्राट दिले. चार महिन्यांत चार कोटी खिचडी पॅकेटचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरज चव्हाण यांची सहा तास कसून चाैकशी केली.
प्राथमिक तपासाअंती यात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत आर्थिक गुन्हेशाखेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सुजीत पाटकर यांच्यासह सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधीत खासगी व्यक्तींविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक गुन्हेशाखेने मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर आणि ठाकरे सेनेचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांची नुकतीच चार तास कसून चाैकशी केली होती. त्यानंतर आता आर्थिक गुन्हेशाखेने संदीप राऊत यांना चाैकशीला हजर रहाण्यासाठी समन्स धाडले आहे. संदीप राऊत यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. संदीप राऊत यांच्या बॅंक खात्यात १० आणि २० आॅगस्ट २०२० रोजी सुमारे सहा लाख ४५ हजार रुपये जमा झाल्याचा आरोप असून याबाबत आर्थिक गुन्हेशाखा त्यांच्याकडे चाैकशी करणार आहे.