E-Insurance Policy : जमाना ई-विमा पॉलिसीचा : जाणून फायदे अन् माेफत सुविधेविषयी

E-Insurance Policy : जमाना ई-विमा पॉलिसीचा : जाणून फायदे अन् माेफत सुविधेविषयी

विमा खरेदी करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला 1 एप्रिल 2024 पासून विमा पॉलिसी डीमॅट स्वरूपात दिली गेली आहे. आतापर्यंत विमा कंपन्यांकडून पॉलिसी हार्ड कॉपी रूपात दिली जात असे. आता नवीन नियमानुसार कंपन्यांनी पॉलिसीधारकांना डिजिटल फॉर्मेटमध्ये विमा पॉलिसी उपलब्ध करून देण्याची पूर्ण तयारी केली आहे. ( E-Insurance Policy )

भारतात विमा बाजारावर देखरेख ठेवण्याचे काम 'इर्डा' संस्थेकडून केले जाते. 'इर्डा'कडून नियमांत वेळोवेळी बदल होत राहतात आणि त्याकडे विमाधारकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आता 1 एप्रिल 2024 पासून होणार्‍या नव्या बदलानुसार विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीला विमा पॉलिसी ही ई-स्वरूपातच मिळेल म्हणजेच सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून दिली जाईल. ही सॉफ्ट कॉपी डीमॅट स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. त्याची कोणतीही हार्ड कॉपी नसेल. या नव्या नियमांची माहिती नसेल तर जाणून घेऊ!

डीमॅट फॉर्मेटमध्ये पॉलिसी मिळणार

विमा खरेदी करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला 1 एप्रिल 2024 पासून विमा पॉलिसी डीमॅट स्वरूपात दिली गेली आहे. आतापर्यंत विमा कंपन्यांकडून पॉलिसी हार्ड कॉपी रूपात दिली जात असे. एखादी व्यक्ती विम्यासाठी दावा करत असेल, तर त्याला हार्ड कॉपी स्वरूपातील प्रमाणपत्र विमा कंपनीत सादर करावे लागत असे. आता नवीन नियमानुसार कंपन्यांनी पॉलिसीधारकांना डिजिटल फॉर्मेटमध्ये विमा पॉलिसी उपलब्ध करून देण्याची पूर्ण तयारी केली आहे. विमा नियामक संस्थेने ही व्यवस्था विमा व्यवसायात सुलभता आणण्यासाठी सुरू केली. त्याचबरोबर विमा कंपन्यांनादेखील या नियमांचा चांगला फायदा होणार आहे.

ई-विमा कशाला म्हणतात?

ई-विम्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे विमा पॉलिसीचे डिजिटल स्वरूप. अर्थात, विमा कंपन्या ग्राहकांना ई-विमा उपलब्ध करून देणार आहे. विमा पॉलिसी ही डिजिटल रूपात असेल. यासाठी ग्राहकांना डीमॅट खाते सुरू करावे लागेल. या डीमॅट खात्यात विमा पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे विमा कंपन्यांकडून ट्रान्सफर केले जाईल. विमाधारकाला डीमॅट खात्याच्या रूपात ई-विमा खाते म्हणजेच ई-आयए सुरू करणे बंधनकारक आहे. कारण, त्याशिवाय विमा कंपनी ग्राहकांना नवीन विमा पॉलिसी विकणार नाही.

सर्व विमा ई-स्वरूपात

केवळ जीवन विमाच नाही, तर आरोग्य विमा, अपघात विमा, वाहन विमा, सामान्य विमा यासह सर्व प्रकारचे विमा आता ई फॉर्मेटमध्ये ग्राहकांना दिले जाईल. यासाठी ग्राहकांना 'ई-आयए' म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाऊंट सुरू करावे लागेल. ग्राहकांना आपले खाते सीएएमएस इन्शुरन्स रिपॉजिटरी कार्वी, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट आणि सेंट्रल इन्शुरन्स रिपॉजिटरी ऑफ इंडिया यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खाते सुरू करता येईल. विमा खाते सुरू करण्यासाठी यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लॉग इन आयडी तयार करा आणि केवायसीशी संबंधित कागदपत्रे अपलोड केल्यानंतर खाते सुरू करू शकता. शिवाय विमा कंपनीने देखील अशा प्रकारचे खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या पोर्टलवर दिली आहे; मात्र हे खाते विमा कंपनीच्या संकेतस्थळावरील 'इन-रिपॉजिटरी'मध्येच सुरू होतील.

ई-विम्याचे फायदे काय?

कोणत्याही विमा पॉलिसीची मॅच्युरिटी ही दीर्घकाळानंतर असते आणि या काळात एखाद्या व्यक्तीचे पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे गहाळ होण्याची दाट शक्यता असते. कधी कागदपत्रे कोठेतरी पडतात, कधी पाण्याने खराब होतात, तर काही वेळा उंदरांकडून कुरतडले जातात. अशावेळी पॉलिसीधारक खराब कागदपत्रांच्या आधारे दावा करू शकत नाही. डिजिटल स्वरूपामुळे ग्राहकांना पॉलिसी सांभाळून ठेवण्याचा ताण राहणार नाही. ई-स्वरूपात विमा पॉलिसी मिळाल्याने अशा समस्या संपतील आणि कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळेल. याचा आणखी एक फायदा म्हणजे ई-विमा खरेदी केल्यानंतर कंपन्यांकडून पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे अपडेट केली जात असेल, तर आपल्या इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाऊंटमध्ये सहजपणे त्यात बदल करता येऊ शकतो. शिवाय नाव, फोन नंबर, पत्ता यात बदल करायचा असेल, तर तोदेखील करता येतो. आणखी एका फायदा म्हणजे, दाव्यासाठी सर्वप्रकारची कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील. ऑनलाईन दावा करताना डीमॅट खात्यातील इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाऊंटची लिंक किंवा विशिष्ट क्रमांक अर्जासोबत देऊ शकतो.

ई-आय खात्याची मोफत सुविधा

ई-आय खाते सुरू करण्यासाठी सध्या कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही; मात्र लवकरच या प्रकारच्या खात्यांवर शुल्क आकारले जाऊ शकते. पॉलिसी खरेदी करणार्‍या व्यक्तीला विमा कंपनीकडे केवळ केवायसीशी संबंधित कागदपत्रे द्यावे लागतील. ही कागदपत्रे दिल्यानंतर विमा सल्लागार किंवा एजंट खाते सुरू करण्याची प्रक्रिया स्वत:च पार पाडेल. फक्त आपण कोणत्या 'रिपॉजिटरी'मध्ये खाते सुरू करण्यास इच्छुक आहात तेवढेच त्याला सांगावे लागेल. ( E-Insurance Policy )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news