Kolhapur Dussehra : कोल्हापुरात अलोट गर्दीत दसरा सोहळा; हत्ती, घोडे, उंट, बँड, लेझीम, ढोल पथकांची भव्य मिरवणूक

Kolhapur Dussehra : कोल्हापुरात अलोट गर्दीत दसरा सोहळा; हत्ती, घोडे, उंट, बँड, लेझीम, ढोल पथकांची भव्य मिरवणूक

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : अपूर्व उत्साह आणि अलोट गर्दीत मंगळवारी (दि. २४) सांयकाळी कोल्हापूरचा दसरा सोहळा झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्यासह पारंपरिक बँड, लेझीम, धनगरी ढोल, ढोल-ताशा, शस्त्रधारी मावळे, खेळाडू यांच्या भव्य मिरवणुकीने सोहळ्याला वेगळाचा साज चढला. कोल्हापूरकरांसह पर्यटक, भाविकांच्या गर्दीने ऐतिहासिक दसरा चौक उशिरापर्यंत फुलला होता.

दसरा सोहळ्यासाठी दुपारी चार वाजल्यापासूनच नागरिक दसरा चौकाकडे येत होते. यामुळे दसरा चौकाकडे येणारे सर्व मार्ग गर्दीने ओसंडून गेले होते. सांयकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी पारंपरिक लावजम्यासह मंदिरातून बाहेर पडली. यापाठोपाठ छत्रपती देवस्थानची तुळजाभवानीची पालखी आणि गुरू महाराज यांची पालखी होती.

पालखीपुढे ध्वजवाहक घोडा, घोड्यांचे पथक, दोन हत्ती, एक बग्गी , त्यामागे ३० मावळ्यांचे पथक, ६० खेळाडूंचे पथक होते. पारंपरिक बँड त्यानंतर तीन पालख्या आणि त्यामागे उंट असा लवाजमा होता. पालखी मार्गावर रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी देखावे उभारले होते. महिलांचे लेझीम पथक, टाळ पथक, ढोल वादनांसह धनगरी ढोलाचा ठेका मिरवणूक मार्गावर सुरू होता. या मार्गावर पारंपरिक पध्दतीच्या १२ कमानी उभारल्या होत्या. मार्गावरील ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे भाऊसिंगजी रोड हा पालखी मार्ग सजला होता.

न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा एन.सी.सी, एन.एस.एस, स्काऊटचे विद्यार्थी स्वागतासाठी थांबले होते. नागरिकांनीही गर्दी केली होती. सांयकाळी सहाच्या सुमारास शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजे यांचे न्यू पॅलेसवरून दसरा चौकात पारंपरिक वातावरणात आगमन झाले. त्यांच्या आगमन प्रसंगी पोलिस बँडच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर करवीर संस्थानचे गीत वाजवण्यात आले. सुर्य मावळतीला जात असताना शम्मीचे पूजन झाले. बंदूकीच्या फैरी झडताच, उपस्थित करवीरकरांनी लकडकोटाकडे धाव घेत सोने लुटले. लुटलेले सोने एकमेकांना देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, बिहारचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, जयश्री जाधव, प्रा. जयंत आसगांवकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दिलीप पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के, डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी.पाटील आदींसह सरदार घराण्यातील मान्यवर, विविध राजकीय पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आदींसह नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news