आचारसंहितेच्या काळात ‘वर्षा’वर राजकीय बैठका; पुराव्यादाखल 24 व्हिडीओ

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आचारसंहितेच्या काळात झालेल्या राजकीय बैठकांचे जवळपास 24 व्हिडीओ आणि इतर पुराव्यांचा पेन ड्राईव्ह काँग्रेसने सोमवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केले. या व्हिडीओंसोबतच प्रसारमाध्यमांत या बैठकांसंदर्भातील बातम्याही पुरावे म्हणून जोडण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली. तसेच आता तरी निवडणूक आयोगाने डोळ्यांवरील पट्टी काढून कारवाई करावी, असा टोलाही सावंतांनी लगावला.
प्रशासनाचा खुलासा

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका सुरू असून हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार सचिन सावंत यांनी केली होती. त्यानुसार आयोगाने प्रशासनाला विचारणा केली. त्यावर या राजकीय बैठका नसल्याचा खुलासा करण्यात आला. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीही हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असून तिथे राज्यभरातून पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी भेटीसाठी येत असतात, असे विधान माध्यमांकडे केले होते. त्यानंतर आयोगाने सावंतांना तक्रारीच्या अनुषंगाने पुरावे सादर करण्याची सूचना केली होती. त्यामुळे सावंत यांनी सोमवारी निवडणूक अधिकारी कार्यालय गाठत विविध पुरावे सादर केले.

सत्ताधार्‍यांच्या बाबतीत तत्परता नाही

यासंदर्भात सचिन सावंत म्हणाले की, दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना बैठकांचे पुरावे सादर केले असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षांवर ज्या तत्परतेने कारवाई केली जाते,तेवढी तत्परता सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत आयोग दाखवताना दिसत नाही. वर्षावरील बैठकांचा बोलका पुरावा सादर केल्यानंतर तरी निवडणूक आयोग कारवाई होईल अशी अपेक्षा करू असे सावंत म्हणाले.

उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे श्रीरामाचे मोठे होर्डिंग लावून मते मागत आहेत. मोग्रा मेट्रो स्टेशनच्या बाहेर हे मोठे होर्डिंग असून त्यात प्रभू रामाचे चित्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे' असा मजकूर आहे. हे होर्डिंग सरळसरळ आचारसंहितेचा भंग करणारे आहे. जनप्रतिनिधी कायद्यातील कलम 123 व उपकलम 3चे हे उल्लंघन असल्याचा आरोप सावंत यांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news