डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार

डॉ. प्रतापसिंह जाधव
डॉ. प्रतापसिंह जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी, शेतकर्‍यांच्या चळवळीसाठी सक्रियतेने लढणारे दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पत्रकारिता क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात चार जून रोजी राज्यातील पहिले नांगरट साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार सामाजिक संस्थेतर्फे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रानकवी विठ्ठल वाघ आहेत. वात्रटीकाकार रामदास फुटाणे उद्घाटक आहेत.

ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सर्वच घटकांमधून विचारमंथन झाले पाहिजे. साहित्यिक, कलावंत, विचारवंत यांनीही शेतकर्‍यांबाबत भूमिका मांडली पाहिजे. असे झाले तर शेतकरी चळवळीला दिशा मिळेल. याचा विचार करूनच नांगरट साहित्य संमेलन आयोजिले आहे. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप संमेलनाचे निमंत्रक आहेत.

ते म्हणाले, संमेलनात शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी, चर्चेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या आंदोलनाची भविष्यकालीन दिशा ठरावी. शेतकर्‍यांचे प्रश्न सुटण्यासाठी या संमेलनामध्ये ठोस उपाययोजना पुढे याव्यात. शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्नांवर साहित्यिकांनी लिहावे, हा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलन तीन सत्रांत होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटक फुटाणे, स्वागताध्यक्ष राजू शेट्टी, निमंत्रक कवी संदीप जगताप व विठ्ठल वाघ मनोगत व्यक्त करतील.

दुसर्‍या सत्रामध्ये 'शेतकरी प्रश्नांचे साहित्य, कला, माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब' या विषयावर परिसंवाद होईल. संपादक वसंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या परिसंवादात पत्रकार निखिल वागळे, प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख, चित्रपट निर्माते प्रवीण तरडे, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. जालंदर पाटील सहभागी होतील.

तिसर्‍या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवीसंमेलन होईल. यामध्ये विजय चोरमारे (कोल्हापूर), भरत दौंडकर (पुणे), अरुण पवार (बीड), विष्णू थोरे (नाशिक), रमजान मुल्ला (सांगली), आबा पाटील (बेळगाव), लता ऐवळे (सांगली), बाबा परीट (कोल्हापूर), सुरेश मोहिते (सांगली), गोविंद पाटील (कोल्हापूर), एकनाथ पाटील (सांगली), अभिजित पाटील (सांगली), बबलू वडार (कोडोली), विष्णू पावले (कोल्हापूर) या कवींना ऐकण्याची संधी मिळेल.

डॉ. आ. ह. साळुंखे, वामनराव चटप यांचाही होणार गौरव

संमेलनामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, तसेच शेतकरी कार्यकर्ता म्हणून शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी नेहमी लढणारे, शरद जोशी यांचे सहकारी, माजी आमदार वामनराव चटप यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news