Dnyanpeeth award : लेखक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Dnyanpeeth award : लेखक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Published on

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे प्रसिद्ध कोकणी लेखक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा २०२१ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार (Dnyanpeeth award) जाहीर झाला आहे. गोव्याचे रवींद्र केळेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे दामोदर मावजो दुसरे साहित्यिक आहेत.

१ ऑगस्ट १९४४  साली जन्मलेले मावजो हे कोकणीतील ज्येष्ठ लेखक असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले आहे. गोवा मुक्तीनंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की वेगळा ठेवावा, यासाठी झालेल्या जनमत कौलाच्या वेळी मावजो यांनी गोवा महाराष्ट्रात विलीन होऊ नये, अशी भूमिका घेत गोवा वेगळा ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी कोकणीत साहित्य लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या कार्मेलीन या  कादंबरीला साहित्य अकादमीचा १९८३ सालचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर कादंबरीचे विविध भाषांत भाषांतर झाले आहे. सूड व सुनामी, सायमन या त्यांच्या कादंबरी आहेत. गाथन, जागराना, रुमडा फूल, भुरगी मुगेली ती हे त्यांचे कथासंग्रह असून, लहान मुलांसाठी त्यांनी कानी एका खोमसाची, एक आशिल्लो बाबुले बालक व चित्रांगी ( कथासंग्रह) ही पुस्तके लिहिली.

अशे घडले शनै गोयंबाब व उच हावेस उच माथेन ही चरित्र लेखनावरील त्यांची पुस्तके आहेत. त्यांच्या कार्मेलीनला १९८३ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच कोकणी भाषा मंडळाचे पुरस्कार दोन वेळा, कला अकादमी पुरस्कार दोन वेळा, जनगंगा पुरस्कार, गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, विश्व कोकणी साहित्य पुरस्कार  आदी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. दक्षिणायन चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

युवा लेखकांनी इतर भाषांतील साहित्य वाचावे

रवींद्रबाब केळेकर यांच्यानंतर आपणास  ज्ञानपीठ पुरस्कार (Dnyanpeeth award) मिळाला याचा आपणास आनंद आहे. आपल्यापेक्षा अनेक श्रेष्ठ लेखक आहेत, त्यांच्या वतीने व गोव्यातील कोकणी साहित्यिकांच्या वतीने आपण हा पुरस्कार स्वीकारत आहे. लेखकांनी आपल्या प्रदेशाच्या सीमा ओलांडून दुसर्‍या राज्यात आपले साहित्य पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी भाषांतरांची गरज आहे.

रवींद्रबाब यांनी आम्हांला निर्भय होण्यास शिकवले. त्यानुसार समाजात जे वाईट घडते त्यांच्या विरोधात आपण बोललो. लेखक समाजाचा मार्गदर्शक असतो. त्यामुळे त्यांने वाईटाविरुद्ध व्यक्त होणे गरजेचे आहे. युवा लेखकांनी इतर भाषेतील भाषांतरित साहित्य वाचावे. तरच  त्यांच्या लेखनाला योग्य तो आयाम येईल, अशी प्रतिक्रिया दामोदर मावजो यांनी आज दि.७ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार घोषीत झाल्यानंतर बोलताना व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news