नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ भावाने सेवा देणाऱ्या, सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा गुरूवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 'राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार' प्रदान करीत गौरविण्यात आले. कार्यक्रमातून वर्ष २०२२ आणि २०२३ च्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात महाराष्ट्राला वर्ष २०२२ साठी १ आणि वर्ष २०२३ साठी २ परिचारिकांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमातून देशभरात सर्वोकृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येकी १५ परिचारिकांना २०२२ आणि २०२३ साठी गौरविण्यात आले. पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मल उपकेंद्र, भूईगावच्या सहायक परिचारिका सुजाता पीटर तुस्कानो यांना २०२२ साठी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे आणि दक्षिण कमांड वैद्यकीय मुख्यालय पुण्याच्या ब्रिगेडियर एम.एन.एस. अमिता देवरानी यांना २०२३ साठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तुस्कानो यांना सहायक परिचारिका (एएनएम) म्हणून ३५ वर्षांचा अनुभव आहे.तर, पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील २१ वर्षांपासून कार्यरत आहेत.ब्रिगेडियर अमिता देवरानी, सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. ब्रिगेडियर देवरानी यांनी ३७ वर्ष लष्करात परिचारिका म्हणून सेवा बजावली आहे.
वर्ष १९७३ पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण ६१४ परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पदक आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.