दिलीप वळसे-पाटील : “गृह विभागावर मुख्यमंत्र्यांची कुठलीही नाराजी नाही”

दिलीप वळसे-पाटील : “गृह विभागावर मुख्यमंत्र्यांची कुठलीही नाराजी नाही”

मुंबई, पुढारी ऑनलाईन : "गृह विभागावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुठलीही नाराजी नाही. आमचा विभाग कुठे कमी पडत असेल तर त्यावर आम्ही अधिक लक्ष देऊ. गृहविभागात विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातात. महाराष्ट्र पोलिसांची 'वन वन टू' कार्यक्रमाचा उद्या शुभारंभ होणार आहे. आजची बैठक ही पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय कामकाजाबाबत चर्चा झाली", असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मांडले आहे.

दिलीप वळसे-पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, "प्रत्येक प्रकरणात गृहमंत्री आदेश देत नाहीत. पोलीस आपापल्या पातळीवर काम करत असतात. आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. सध्या देशात वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात महागाईचं संकट सुरू आहे. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. भाजपकडून जी आश्वासनं दिली गेली होती, ते आश्वासन त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे समाजात सध्या भाजपकडून अशांतता पसरविण्याचे काम केलं जात आहे. अपयश लपविण्यासाठी भाजप अशी कारस्थानं करत आहे", अशीही टीका वळसे पाटील यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष पराकोटीला जाऊन पोहोचला आहे. भाजप नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीकडून धाडी सुरु असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संतप्त भावना व्यक्त करत आहेत. तुलनेत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह खात्याकडून भाजप नेत्यांच्या बाबतीत घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून शिवसेनेनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

गृहखात्याला आता ठोस भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले.

ईडीचा ससेमीरा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकील तसेच देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्यावरही ईडी कारवाई झाली आहे.

मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख अटकेत आहेत. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि अनिल परब यांच्यावरबही भाजपकडून आरोप होत आहेत. मुंबई मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरही ईडी कारवाई झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news