मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार, या प्रकरणाची 'एसआयटी' मार्फत कालबद्ध चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मनोज जरांगे- पाटील यांच्याशी मला देणेघेणे नाही. मात्र, त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधले जाईल. संभाजीनगर, पुणे आणि नवी मुंबईत सोशल मीडिया वॉर रूम कोणी सुरू केली, यासह संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत कालबद्धरीतीने सखोल चौकशी केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या
खरे तर मला याविषयी बोलायचे नव्हते. मराठा सामाजाच्या संदर्भात मी काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकले. त्यामुळेच जेव्हा जरांगे माझ्याविषयी अपशब्द बोलले. त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, असे फडणवीस यांनी नमूद केले.
कोणालाही आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार असल्याचा प्रश्नही फडणवीसांनी केला. जरांगेना पुढे आणणारे कोण आहेत, कोणाच्या कारखान्यावर बैठक झाली, कोणी दगड पुरवले, दगडफेक कोणी करायला सांगितली, हे आता आरोपी कबूल करू लागले आहेत. पोलिसांवर दगडफेक करायला कोणी सांगितले, हेही आरोपींनी जबाबात सांगितले.
दगडफेक झेलणारे पोलिस आपले नाहीत का? याआधीचे मराठा मोर्चे शांततेने झाले होते. पण आताचे आंदोलन शांततेने झालेले नाही. त्यांचे (जरांगे) कोणासोबतचे फोटो बाहेर येऊ लागले आहेत, कोणाचे कार्यकर्ते म्हणवत आहेत, कुठून पैसे येत आहेत, हे सगळे बाहेर येत आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.