इंदापूर तालुक्यातील द्राक्षशेती नष्ट होण्याच्या मार्गावर; निसर्गाचा लहरीपणा, बागायतदार कोलमडला

इंदापूर तालुक्यातील द्राक्षशेती नष्ट होण्याच्या मार्गावर; निसर्गाचा लहरीपणा, बागायतदार कोलमडला
Published on
Updated on

शेळगाव : संतोष ननवरे 

इंदापूर तालुक्यातील द्राक्षशेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाचा लहरीपणा या बागांच्या मुळावर आला असून, बागायतदारांना धडकी भरवतोय. इंदापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. निर्यातक्षम द्राक्षांना एरवी मिळणारा तीनअंकी बाजारभाव एकअंकीवर आला आहे.

इंदापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून व सध्या वातावरणातील झालेला बदल, पडत असलेले धुके, दवबिंदू या खराब हवामानामुळे द्राक्षघडातील मणी फुटण्यास सुरुवात झाली आहे. फळधारणा अवस्थेतील, परिपक्व द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे. या बागा अनेक रोगांना बळी पडू लागल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाला मिळणारा 100 रुपयांहून अधिकचा तीनअंकी बाजारभाव केवळ एकअंकी सात व आठ रुपये प्रतिकिलोवर आला आहे. निसर्गाचा लहरीपणा द्राक्ष बागायतदारांना धडकी भरवत आहे.

इंदापूर तालुक्यात तसेच पश्चिम भागातील निमगाव केतकी, रामकुंड, वरकुटे, शेळगाव, अंथुर्णे, बोरी काझडसह अन्य भागांत मागील 8 ते 10 वर्षांच्या काळात द्राक्षबरोबरच डाळिंबशेती मोठ्या प्रमाणात पिकवली जात होती. तेल्या, मर यांसह अन्य रोगांमुळे डाळिंबशेती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अनेक शेतकरी द्राक्षासह अन्य पिकांकडे वळले. मात्र, मागील दोन- तीन वर्षांतील बदलत असलेले हवामान, अवकाळी पाऊस, यासह निसर्गातील अचानकपणे वेळोवेळी होणारे अन्य बदल तसेच मागील दोन वर्षांपासूनचे कोरोना संकट, यामुळे द्राक्ष, डाळिंबसह अन्य पिके मातीमोल दरात विक्री होत असल्याने प्रामुख्याने द्राक्षशेतीला घरघर लागली आहे. द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पन्न बोरी, शेळगाव व अंथुर्णे या भागांत घेतले जाते. इंदापूर तालुक्यातील द्राक्षांचा निर्यातीत नावलौकिक आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून ही निर्यातक्षम द्राक्षशेती मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. द्राक्षशेतीसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. लहान मुलांचे संगोपन ज्या पध्दतीने केले जाते, त्या पध्दतीने द्राक्षबागांना जोपासले जाते. मागील दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस, सध्या पडत असलेले धुके, दवबिंदूमुळे होत्याचे नव्हते झाले असून, परिपक्व झालेल्या द्राक्षबागेत मण्यांमध्ये दव व पावसाच्या पाण्यामुळे मणी फुटले. त्यांना तडे गेल्याने त्यांचा दर्जा मातीमोल झाला आणि नीचांकी दरात विक्री करावी लागत आहे. द्राक्ष बागायतदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. शासनाने भरघोस मदत जाहीर करावी, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी केली आहे.

2014 मध्ये इंदापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमध्ये द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून आजतागायत द्राक्षबागांवर निसर्गाचे अस्मानी संकटाचे सावट कायम आहे. आम्ही एकरी 7 ते 8 टन निर्यातक्षम उत्पन्न घेत असतो. निर्यातक्षम द्राक्षाला प्रतिकिलो 110 रुपयांहून अधिकच बाजारभाव मिळतो. मात्र, चालू वर्षी अवकाळी पाऊस, धुके, दवबिंदूमुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून, 7 ते 8 रुपये किलोने द्राक्षे विकली असल्यामुळे जवळपास 70 लाखांहून अधिकचा तोटा झाला आहे.

– मोहन दुधाळ व सुभाष दुधाळ,
द्राक्ष बागायतदार, शेळगाव (ता. इंदापूर)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news