मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या शिवराळ भाषेतील टीकाटिपणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. हे अध्यक्ष आहेत की गल्लीतील नेते हे समजत नाही. आम्ही संयमी, शांत आहोत याचा अर्थ प्रत्युत्तर देणार नाहीत असा नाही. ईट का जबाब पत्थर से देना जानते है, असा थेट इशारा फडणवीसांनी दिला. तसेच, तुम्ही कोविड काळात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे, बॉडी बँगमध्ये घोटाळा करणारे कफनचोर आहात. तुमच्या घोटाळ्याची मालिकाच मी बाहेर काढणार आहे, असल्याचा सुतोवाचही फडणवीसांनी केला.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त दादर येथील कामगार मैदानावर आयोजित मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. फडणवीस म्हणाले की, ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेससोबत जाईल, त्यादिवशी दुकान बंद करेन असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. परवा त्यांच्या सुपुत्राने मातोश्रीवरून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना मत देणार, पंजाचे बटन दाबणार असल्याचे सांगत बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांचे हिंदुत्व जपण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कामगार मैदानावरील या मेळाव्यास मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल, उज्ज्वल निकम, मिहीर कोटेचा उपस्थित होते. याशिवाय मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी व्यासपीठावर होते.