जळगाव ; पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. यामुळे एसटीची वाहतुक अद्यापही सुरू झालेली नाही. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी संपकरी आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करत तोडगा करण्याचा प्रयत्न केला. परंतु एसटी कर्मचारी आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. ते जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (ST Strike)
ते म्हणाले की, राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मागची दोन वर्षे राज्यातील यंत्रणा सुरळीत नव्हती आता कुठेतरी गाडी रुळावर येत आहे. माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे कामावर रुजू व्हा.
गरीबांना एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. एखादा विषय कितपत ताणवावा याला मर्यादा असल्याचेही अजित पवार म्हणाले.
एसटी कर्मचारी आपल्यापैकीच एक आहेत त्यांनी अट्टाहास सोडावा सामान्य लोकांचे एसटी बंद असल्यामुळे प्रचंड हाल होत आहे. माझी विनंती आहे आम्हाला टोकाची पावले उचलायला लावू नका. किती दिवस वाट बघायची सहशिलता संपत चालली आहे.
सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कामावर हजर व्हावे अशी माझी विनंती असल्याचे पवार म्हणाले.
एसची कर्मचाऱ्यांची महत्वाची मागणी पगारवाढीची होती आता मानधन बऱ्यापैकी वाढवले आहे. आजूबाजूच्या राज्यांएवढे कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले आहे. पगार कमी होता ही गोष्ट खरी आहे. पण आता पगार वाढवला आहे.
तसेच पगाराच्या वेळेबाबतचाही निर्णय झाला आहे.
अनिल परब यांनी शब्द दिला आहे आणि आम्हीही त्याला बांधिल आहोत. त्यामुळे आता टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.