पुढारी ऑनलाईन डेस्क : कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेलीा आहे. ईडीने आज (दि. २१) रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या आप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आज रात्री उशीरा ईडीचे अधिकारी आणि मोठा पोलीस फौजफाटा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानाबाहेर पोहोचले. अनेक कार्यकर्ते केजरीवाल यांच्या निवास्थानाबाहेर होते. मात्र ईडीने आज त्यांना अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे देखील पहायला मिळाले. त्यांच्या अटकेनंतर दरम्यान यावेळी आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे देखील पहायला मिळाले.
या अटकेनंतर आप नेते आतिशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, "ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याची बातमी आम्हाला मिळाली आहे. आम्ही नेहमी म्हणत आलो की, अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील. ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आमचे वकील SC पर्यंत पोहोचले आहेत. आम्ही आज रात्री SC ला तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करू."
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर आज (दि.२१ मार्च) सुनावणी झाली. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. या टप्प्यावर आम्ही अंतरिम दिलासा देण्यास इच्छुक नसल्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, न्यायालयाने या याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. (Delhi excise policy case)