Raigad News: महाडमधील ब्ल्यू जेट कंपनी दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू

Raigad News: महाडमधील ब्ल्यू जेट कंपनी दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू


महाड : ब्ल्यू जेट कंपनीतील दुर्घटनेची स्थानिक प्रशासनासह संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सखोल चौकशी सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. खात्रीशीर माहितीनुसार २०२० नंतर या कारखान्याला फॅक्टरी इन्स्पेक्टरने भेट दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Raigad News)

सोमवारी सायंकाळी सात वाजता सर्व अकरा मृतदेहांचा तपास पूर्ण झाला. त्यानंतर एनडीआरएफ पथकाकडून सुरू असलेले सर्च ऑपरेशन पूर्ण झाल्याची घोषणा स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आली. त्यानंतर आज (दि.७) सकाळी चौकशी समितीच्या प्रतिनिधीने कंपनी परिसराला भेट दिली. यावेळी शीघ्र कृती दलाच्या गाड्या अजूनही तैनात ठेवण्यात आल्याचे दिसून आले. (Raigad News)

शासकीय नियमानुसार दुर्घटनेनंतर किमान ३० दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करावयाचा असतो. ही बाब लक्षात घेता चौकशी समितीकडून आता प्रत्यक्षात कंपनीमध्ये दिलेली रसायनांच्या उत्पादनाबाबत माहिती घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने दुर्घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी प्राप्त झालेली केमिकल महत्त्वाची ठरणार आहे. ज्या शासकीय विभागांकडून या कंपनीसंदर्भात हलगर्जीपणा झाला असेल, त्या विभागांमधील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, कंपनीच्या कामगारांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. या दुर्घटनेत २० टक्के भाजून विक्रम ढेरे हा कामगार जखमी झाला आहे. या कामगाराच्या प्रकृतीची चौकशी करण्याबाबत कंपनीचा कोणताही अधिकारी चार दिवसानंतरही गेलेला नाही. अशी तक्रार त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news