आंध्र, ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका

आंध्र, ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका
Published on
Updated on

नवी दिल्ली : पीटीआय : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टी भागात 'जवाद' हे चक्रीवादळ आकार घेऊ लागले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार हे चक्रीवादळ शनिवारी (ता. 4) सकाळी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला तडाखा देऊ शकते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागात 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा आणि अतिवृष्टीचा इशाराही वर्तवला आहे.

दरम्यान, जवाद चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. बैठकीत मंत्रिमंडळ सचिव राजीव गाबा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या चक्रीवादळाबाबत सरकार अ‍ॅलर्टवर असून आढावा बैठकीनंतर नॅशनल डिझास्टर रीस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) 62 पथके तैनात केली आहेत. हे चक्रीवादळ 4 डिसेंबर रोजी सकाळी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारी भागात धडक देऊ शकते. बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अंदमानच्या पश्चिम भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला. 24 तासांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

केंद्रीय गृह मंत्रालयदेखील या राज्यांशी संपर्कात असून परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवून आहे. तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजे आणि हेलिकॉप्टर्स तयार ठेवली आहेत. हवाई दल, इंजिनिअर टास्क फोर्स युनिट, ऊर्जा मंत्रालयाला वादळानंतर वीज सेवेबाबत तसचे आरोग्य आणि जहाज व बंदरे आदी सर्व मंत्रालये विभागांना एकमेकांशी कनेक्ट राहून सहकार्याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती पीएमओतर्फे देण्यात आली.

ओडिशातील 13 जिल्ह्यांना रेड अ‍ॅलर्ट

ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने राज्यातील 13 जिल्ह्यांना रेड अ‍ॅलर्ट लागू केला आहे. गजपती, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देत रेड अ‍ॅलर्ट दिला आहे. केंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगडा आणि कोरापुट जिल्ह्यांत 4 डिसेंबरसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट दिला आहे.

95 रेल्वे गाड्या तीन दिवस रद्द

भुवनेश्वर : जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी म्हणून गुरुवारपासून 95 रेल्वे गाड्या तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागाने दिली आहे. यात मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

जवाद चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी 29 पथके तैनात केली होती. आणखी 33 पथके तैनात केली जात आहेत. लष्कर आणि नौदलासही तयारीचे आदेश दिले आहेत. चक्रीवादळाचा तडाखा बसेल अशा ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे.
– जनरल अतुल करवा, संचालक, एनडीआरएफ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news