नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : CWC Meeting : उत्तर प्रदेशसह पाच राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या ही बैठक फक्त काँग्रेस वर्किंग कमिटीची असल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. आज सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडणुका येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. परंतु काँग्रेसला अद्यापही नेतृत्व नसल्याने कालावधी पूर्वीच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या G-23 मधील काही नेत्यांनी महत्वाची बैठक घेतली होती.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी झालेल्या बैठकीत मनीष तिवरी यांच्यासह अन्य नेत्यांनी हजेरी लावली होती. पंजाबमध्ये असलेल्या सत्तेसोबत काँग्रेसने उत्तर प्रदेश गोवा मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने सीडब्ल्युसीची बैठक महत्वाची मानली जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी निवडणुकीची सर्वच धुरा आपण सांभाळली होती. परंतु काँग्रेसला दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. दरम्यान राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसून आले. याचबरोबर ४०० जागांपैकी काँग्रेसच्या ३८० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
काँग्रेसच्या पराभवानंतर केरळचे खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधीच उच्च पातळीवर बदलांची मागणी केली आहे. मात्र, कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि डीके शिवकुमार यांनी गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त केला आहे. पराभवानंतर यूपी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, यूपी काँग्रेसचे इलेक्ट्रॉनिक मीडिया समन्वयक झीशान हैदर यांची नेतृत्वाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये गटबाजी आणि कलहात अडकलेल्या काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आम आदमी पक्षाने तेथे ९२ जागा जिंकून मोठा विजय मिळवला. काँग्रेसला फक्त १८ जागांवर समाधान मानावे लागले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे स्वत: निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
यूपीमध्ये काँग्रेस अवघ्या दोन जागांवर थांबली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यताही एक्झिट पोलने वर्तवली होती. मात्र निकाल आल्यावर काँग्रेस खूपच मागे पडली. गोव्यातही काँग्रेसचे असेच हाल झाले. मणिपूरमध्येही काँग्रेस अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.