आदमापुरात बाळूमामा देवालयाच्या अमावस्या यात्रेला भाविकांची गर्दी; वाहतूकीची कोंडी, वाहनांच्या रांगा

बाळूमामा देवालय आमावस्या यात्रा
बाळूमामा देवालय आमावस्या यात्रा
Published on
Updated on

मुदाळतिट्टा; प्रा.शाम पाटील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील बाळूमामा देवालयाच्या दि.10 मार्च (रविवार) अमावस्या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीच्या कोंडीला भाविकांना सामोरे जावे लागले. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. प्रत्येक अमावस्या यात्रेला वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला भक्तांना सामोरे जावे लागत असतानाही प्रशासनाच्यावतीने कोणतीही दखल अथवा उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का? वाहतुकीला शिस्त कधी लागणार? असा सवाल केला जात आहे.

आदमापूर येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला तसेच मुदाळतिट्टा ते निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो. येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतुकीला मोकळा मार्गच राहत नाही. यामुळे या कोंडीचा सामना भाविकांना करावा लागतो. मंदिराजवळ वाहनतळ असताना देखील केवळ दर्शन झाल्यावर चटकण घरी परतीचा प्रवास करता यावा यासाठी गाड्या रस्‍त्‍याच्या कडेला लावल्‍या जातात. भक्तांच्या या मानसिकतेमुळे सर्वांनाच वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते.

राधानगरी-निपाणी रस्ता नव्यानेच करण्यात आला आहे. हा रस्ता करत असताना मुदाळतिट्टा ते निढोरी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे होते. पण रुंदीकरण ऐवजी रस्ता अरुंदच झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या गटारावर उंचवटा निर्माण केल्याने वाहने उभी करण्यासाठी मिळत असलेली दोन फूट जागा पुन्हा कमीच झाली आहे. याचा फटका वाहतुकीला होत आहे. येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रशासना समोर उभा आहे, पण हा रस्ता नव्याने होत असताना संबंधित अधिकारी वर्गाच्या ही गोष्ट लक्षात न येणे ही आश्चर्यजनक बाब असल्याचे भाविक बोलत आहेत. भविष्यात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असणार असल्यामुळे पुन्हा याच समस्येला सामोरे जावे लागेल यात शंका नाही. दोनतीन तास झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे भक्तांसह बाहेरगावी उद्योग व्यवसाय, नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवासी व बिद्री गारगोटी मुरगुड सरवडे मुदाळ येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसला आहे.

प्रशस्त पार्किंगची गरज…

देवस्थान समितीच्या वतीने सध्या असलेली पार्किंग व्यवस्था ही अपुरी आहे. त्यामुळे भविष्यात भाविकांना आपली वाहने पार्क करता येतील यासाठी मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रशस्त पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध करणे हेच ध्येय देवस्थान समितीला समोर ठेवावे लागणार आहे. सध्या आदमापूर मुदाळ परिसरात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जागा खरेदी करणे व मिळवणे हा मोठा प्रश्नच निर्माण होणार आहे. काही ठिकाणी खासगी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, पण तेथे वाहने पोहोचणे कठीण होत असल्याने ती रिकामीच राहतात.

पर्यायी मार्गाचा विचार व्हावा…

अमावस्या यात्रे प्रसंगी आदमापूर येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन पर्यायी वाहतूक मार्गांचा विचार होणे गरजेचे आहे. मुदाळ तिट्टा-हुतात्मा स्वामी वारके सुत गिरणी- वाघापूर हायस्कूल जवळून वाघापूर पाटी-मुरगुड व बिद्री,- सोनाळी- निढोरी मार्गे मुरगूड अशा पर्यायी मार्गांचा विचार करून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news