नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : यूपीआय, पाईंट ऑफ सेल (पीओएस) यंत्राद्वारे खरेदी करण्यात वाढ झाली आहे. मात्र, क्रेडिट कार्डद्वारे होणार्या व्यवहारांत वेगाने वाढ होत असून, मार्च महिन्यात प्रथम क्रेडिट कार्डद्वारे झालेल्या ऑनलाईन व्यवहाराने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मार्च-2023च्या तुलनेत रक्कमेत वीस टक्क्यांनी, तर फेब्रुवारी-2024च्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, डेबिट कार्डच्या व्यवहारांत घट होत असल्याची माहिती समोर आली आहे.
यूपीआय व्यवहारामुळे रोखीच्या व्यवहारांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. तर, मोठे व्यवहार डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे केले जात आहेत. यूपीआयचा पर्यायही त्यासाठी आहे. विविध कंपन्या त्यांना क्रेडिट कार्डवर आकर्षक सूट देतात. दीड ते दोन महिने पैसे शून्य टक्क्यांनी वापरायला मिळतात, असे फायदे असल्याने क्रेडिट कार्ड वापर वाढत आहे.
मार्च-2023 मध्ये क्रेडिट कार्डद्वारे 86,390 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये 94,774 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. तर, मार्च 2024 मध्ये हा आकडा वाढून 1 लाख 4 हजार 81 कोटी रुपयांवर गेला आहे. तर, पॉईंट ऑफ सेल यंत्राद्वारे कार्ड स्वाईप करून 60 हजार 378 कोटी रुपयांचे व्यवहार मार्चअखेरीस झाले.
मार्च महिन्यात दुकानांतील डेबिट कार्ड व्यवहारांची संख्या 30 टक्क्यांनी घटून 11.6 कोटींवर आली आहे. तर ऑनलाईन व्यवहारांसाठी होणारा वापर 41 टक्क्यांनी घटून 4.3 कोटींवर आला आहे. दुकानातील व्यवहारांची उलाढाल 17 टक्क्यांनी घटून 29,309 आणि ऑनलाईन व्यवहारांची उलाढाल 16 टक्क्यांनी घटून 15,213 कोटी रुपयांवर आली आहे.