मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; लोकसभा निवडणुकीत राज्यातील 15 मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असून मुंबईत महायुती विजयाचा षटकार मारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या पदरात कमी जागा मिळतील, अशी चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटपर्यंत जागांवरील दावा कायम ठेवल्यामुळे शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. याबाबत समाधान व्यक्त करताना शिंदे म्हणाले, काही विद्यमान खासदारांच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात यश आले आहे. मात्र, भावना गवळी, हेमंत पाटील यांच्यासारख्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. अंतिम जागावाटपानंतर शिवसेनेतील नाराजांची समजूत काढली जाईल.
आपले मतभेद बाजून ठेऊन प्रत्येकाने महायुतीचा धर्म पळाला पाहिजे. पुढील भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे. हा अजेंडा पसंत नसणारे तुमच्यावर टीका करत राहणार. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. राज्यातील जनतेसमोर तुम्ही विकासाचा मुद्दे मांडा. महाराष्ट्रातील इतर भागातील निवडणुका आता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या भागातून मुंबईत प्रचारासाठी येणार्या कार्यकर्त्यांची मदत घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीत केल्या.
राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव भेटीसाठी आले असता त्यांच्यासोबत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली.
मुंबईत महायुतीच्या जागावाटपात भाजपाला 3 तर शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेनेकडून दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई उत्तर-पश्चिममधून रविंद्र वायकर तर दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार आहेत. हे सर्व उमेदवार हमखास विजय होतील असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मी माझ्या सर्व सहकार्यांसोबत परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. इतकेच नाहीतर लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा आपण जोमाने प्रचार करणार आहोत. शिवसेनेच्या पक्षप्रवेशामुळे मी पुन्हा एकदा माझ्या घरात येत आहे, असे संजय निरुपम यांनी सांगितले