पुढारी ऑनलाईन डेस्क
कोल्हापुरातल्या जुन्या राजवाड्याजवळ लोकं जमली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि ताण होता. कारण आपल्या तरुण राजानं सगळ्यांना का बोलावलं याचीच काळजी सर्वांना होती. सगळी एकमेकांना विचारत होती. का बोलावलयं. काय झालयं. नेमकं काय होणार आहे. कोणालाच माहिती नव्हत. एवढ्यात पांढरे कपडे घातलेले काही परिचारक मोठ्या पेट्या घेऊन आले. या परिचारकांनी त्या गर्दीतच एक खुर्ची टाकली. तेवढ्यात भारदस्त राजा तिथ आला आणि त्या खुर्चीवर बसला. सगळी लोक आश्चर्याने राजाकडे बघत होती. हे काय चाललंय कोणालाच कळत नव्हतं. लोकांच्यातली कुजबूज वाढली होती.
त्या आलेल्या परिचारिकापैकी एकाने पेटीतलं एक खोका काढला. त्यात एक इंजेक्शन होतं. ते इंजेक्शन औषधान भरलं. हे इंजेक्शन आणि औषध बघून सगळी लोक बघू लागले. तरुण राजा मात्र शांत खुर्चीवर बसला होता. राजानं लोकांना जवळ बोलावलं. परिचारकांच्या जवळ असलेल इंजेक्शन जमलेल्या लोकांना दाखवलं. ते इंजेक्शन परिचारिकांनी राजांच्या दंडात दिलं. परिचारिकांनी सगळं सामान परत पेटीत ठेवलं.
तो तरुण राजा खुर्चीवरुन शांतपणे उठला. आणि गर्दीला सामोर गेला. बघा डॉक्टरांनी मला सुई टोचली. मला काय झाल का? समोर असलेली गर्दी शांत होती.
सुई टोचल्यामुळे काही होत नाही असं हा तरुण राजा लोकांना सांगत होता. पुढ राजा तिथून निघून गेला. लोकही निघून गेली. पुढं गावा गावात हीच चर्चा होती. तरुण राजा प्रत्येक गावात जावून लोकांना भेटू लागला. इंजेक्शन घेऊनही राजाला काही झालं नाही. हे पाहून लोकांच परिवर्तन होत होतं. त्यामुळे लोक लस घ्यायला लोक जास्त संख्येने जाऊ लागली. स्वत: पुढाकार घेत एका राजानं उदाहरण लोकांसमोर ठेवलं होत. लोकांच्यात लसीविषयी परिवर्तन करण्यात राजा यशस्वी झाला. हा तरुण राजा म्हणजे श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज.
इसवी सन १८९७ मध्ये भारताला प्लेगच्या साथीन वेढलं होत. देशात रोज हजारो लोक मरत होती. त्यावेळी प्लेगची भिती एवढी होती की लोक गावच्या गाव सोडून जात होती. लोकांना आपण जगणार की नाही याची शाश्वती सुध्दा नव्हती. करवीर संस्थानात हीच परिस्थिती होती. त्यावेळी प्लेग वरील लस आली होती. पण ती लस घेण्यास कोण पुढ येत नव्हतं. लसीची भिती प्रत्येकाच्या मनात होती.
करवीर संस्थानातील लोकांना या साथीपासून वाचवायचं असेल तर पहिल्यांदा लोकांच्या मनातील लसीची भिती काढून टाकली पाहिजे. हे शाहू राजांनी ठरवल होतं. लस करवीर संस्थानात आणायचं ठरवलं. राजांनी प्रयत्न करुन मुंबईतून खास रेल्वेचा डबा आरक्षित करुन लस संस्थानात आणली. संस्थानात मोठ्या संख्येने लसीकरण करुन घेतलं. त्यावेळी प्लेगच्या साथीने देशात हजारोंच्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला पण करवीर संस्थानात एकाचाही मृत्यू झाला नाही. संस्थानात लसीकरण वाढवलं होत. त्यामुळे प्लेगची साथ आटोक्यात आली होती. राज्यकर्ता दूरदृष्टीचा असेल तर कोणत्याही संकटावर मात करु शकतो. हेच राजांनी दाखवून दिल होतं.
प्लेगची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूरच्या कोटातीर्थ भागात हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं. प्लेगवर कोणतंही औषध उपलब्ध नव्हतं आणि प्रतिबंधात्मक लशीचाही शोध लागायचा होता. शाहू महाराज स्वतः होमिओपॅथीचे औषधोपचार घेत. होमिओपॅथीमध्ये प्लेगवर उपचार असल्याची माहिती कळताच शाहू महाराजांनी सार्वजनिक दवाखाना काढला. तो देशातला पहिला सार्वजनिक होमिओपॅथी दवाखाना ठरला होता.
आता जसा कोरोनामुळे लॉकडाउन आहे. तसाच त्यावेळी महाराजांनी करवीर संस्थानात लॉकडाउन केला होता. त्यावेळी लॉकडाउनच्या या दिवसांमध्ये हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बुडतो याची जाणीव शाहू महाराजांना होती. अशा मजुरांसाठी कळंब तलावावर सरकारने झोपड्या बांधल्या आणि तलावाच्या कामावर मजूरी मिळेल अशी तजवीज केली. गरीब जनतेला लॉकडाउनची झळ बसू नये म्हणून महाराजांनी तजवीज केली होती.
श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात सामाजिक सुधारणांत मोठ बळ दिलं आहे. समाजाला घडवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. महाराजांनी संस्थानातील सगळा भाग घोड्यावरुन पालता घातला होता. त्यामुळे त्यांना लोकांच्या गरजा माहित होत्या. राजांनी गावा गावतील विहिरींची खोली वाढवणे, गाळ काढणे सारखे अनेक उपक्रम केले. जलसमृद्धीच्या दिशेने मोठ पाऊल ठेवलं. खासगी सावकारांविरोधात त्यावेळी महाराजांनी कायदा केला होता. संस्थानात अनेक योजना महाराजांनी राबविल्या आहेत.