चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकांत २ महिन्याच्या नवजात बालकाची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोंपीना बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. नवजात बालकाला साडेदहा हजारात आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे बालकाची विक्री करण्यात येणार होती. चंद्रकांत मोहन पटेल (वय ४०) रा. इंदिरानगर संगम सोसायटी, मलाड ईस्ट, मुंबई, दौपदी राजा मेश्राम, (४०) धम्म नगर गिट्टी खदान, नागपूर असे आरोपींची नावे आहेत. या घटनेने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रविवारी (२५ डिसेंबर) ला १२६५५ या क्रमांकाच्या नवजीवन एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक ५ व ६ मध्ये एक दाम्पत्य नवजात बालकाला सोबत घेत प्रवास करीत होते. हे दाम्पत्य आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे बाळाला घेऊज जाणार होते. रेल्वे पोलिस नागपूर यांना, हे दाम्पत्य हे नवजात बाळाची तस्करी करून विक्री करण्याकरीता नेत असल्याची तक्रार मिळाली होती. नागपूर रेल्वे पोलिसांच्या तक्रारीवरून बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी याची दखल घेतली. तस्करी रोखण्याकरीता आरोपींच्या शोधात मोर्चेबंदी केली. रेल्वेचे पोलिस अधिकाऱ्यांनी बोगीमध्ये जावून चौकशी केली असता, त्या दाम्पत्यांनी स्वतःला पती-पत्नी असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्याकडील २ महिन्याचे नवजात बाळ हे सतत रडत होते. त्यामुळे त्या दाम्पत्यावर संशय निर्माण होऊन त्या दाम्पत्यांला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी कसून चौकशी करीत मोबाईल तपासून पाहिला असता, त्यामध्ये नवजात बाळाची विजयवाडा येथे विक्री करणार असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या चौकशील दोघांनीही नवजात बाळाची तस्करी करून विक्री करणार असल्याचे कबूल केले. साडेदहा हजारात नवजात बाळाची विक्री आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांच्याकडे करणार असत्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. प्रवीण महाजन, संजय शर्मा, सिंह, रेल्वे पोलीस राठोड यांच्या पथकाने ही मानवी तस्करी रोखण्याकरीता मोठी कारवाई केली आहे.
हेही वाचा :