ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर, दीपक कोचर, वेणुगोपाल धूत यांना आणखी दोन दिवसांची कोठडी

ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर, दीपक कोचर, वेणुगोपाल धूत यांना आणखी दोन दिवसांची कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत, तसेच आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआय न्यायालयाने आणखी २ दिवसांची कोठडी आज (दि.२८) सुनावली आहे. आज सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले होते. धूत यांच्यावर आयसीआयसीआय बँकेची Videocon Loan Fraud केल्याचा आरोप आहे. तर चंदा कोचर यांच्यावर पदाचा गैरवापर करून पती दीपक कोचर यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे.

आयसीआयसीआय (ICICI Bank) बँक कर्ज फसवणूक प्रकरणी (ICICI Bank Fraud Case) सीबीआयने बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. मार्च 2018 मध्ये चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला आर्थिक लाभ देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. 26 ऑगस्ट 2009 रोजी व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला 300 कोटी रुपये आणि 31 ऑक्टोबर 2011 रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला 750 कोटी रुपये मंजूर करणाऱ्या समितीच्या चंदा कोचर या सदस्य होत्या. समितीच्या या निर्णयामुळे बँकेच्या नियमावलीचे आणि धोरणाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

चंदा कोचर व त्यांचे पती आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांच्यासह नुपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांखाली नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपी आहेत.

व्हिडिओकॉन समूहाला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3,250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी न्यूपॉवरमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर एका निवेदनात म्हटले होते की आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटात खाजगी कंपन्यांना काही कर्ज मंजूर केले होते.

मे 2020 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची कोट्यवधी रुपयांचे कर्ज आणि त्याच्याशी संबंधित इतर प्रकरणांमध्ये चौकशी केली. हे कर्ज ICICI बँकेने 2009 आणि 2011 मध्ये व्हिडिओकॉनला दिले होते. त्यावेळी चंदा कोचर या बँकेच्या एमडी आणि सीईओ होत्या. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवला होता. यानंतर ईडीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news