नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मोदी सरकारच्या काळात २०२१ मध्ये जी जनगणना होणार होती, ती अद्याप झालेली नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षण संपवायचे आहे. असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. काँग्रेस सरकारने २०११ मध्ये जनगणना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने जात जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षण संपवायचे आहे, म्हणूनच देशात २०२१ मध्ये होणार असलेली जनगणना अद्याप झालेली नाही. तसेच काही अहवालांचा दाखला देत लोकसभा निवडणुकीत भाजपचा देशभर सफाया होणार असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर आणि दुसऱ्या टप्प्याच्या आधीच्या अंदाजावरुन भाजपच्या कामगिरीत मोठी घसरण होणार आहे. तळागळात मोदी सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. असेही जयराम रमेश म्हणाले.
रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत देशातील कुटुंबांनी त्यांचे सोने गहाण ठेवून बँकांकडून १ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. ही माहीती फक्त बँकांमधील आहे. यात असंघटित क्षेत्र आणि सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश नाही. सर्व क्षेत्रांतून घेतलेल्या कर्जाच्या आकड्यांची तुलना केली तर लक्षात येईल की, गेल्या १० वर्षांत देशातील प्रत्येक चार कुटुंबांपैकी एका कुटुंबाने सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे आणि पंतप्रधान मंगळसूत्राबद्दल बोलतात. असेही जयराम रमेश म्हणाले.
वारसा करावर बोलताना जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वारसा कराचा उल्लेख नाही. तो काँग्रेसचा अजेंडाही नाही. राजीव गांधींनीच १९८५ मध्ये वारसा कर हटवला होता. याउलट अरुण जेटली, जयंत सिन्हा यांनी २०१४-१९ दरम्यान वारसा कराला समर्थन दिले होते. आज पंतप्रधान मोदी काँग्रेसला दोष देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, काँग्रेसच्या न्याय पत्रात संपत्तीच्या पुनर्वितरणाची चर्चा आहे. यावर काँग्रेसच्या न्याय पत्रात एकही शब्द दाखवावा, जो संपत्तीच्या पुनर्वितरणाबद्दल भाष्य करतो, असे थेट आव्हान जयराम रमेश यांनी दिले.