नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हे दाखल

नितेश राणे, गीता जैन
नितेश राणे, गीता जैन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक भडकावू विधाने केल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे व गीता जैन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येताच न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याने अखेर राज्य सरकारने याप्रकरणी नितेश राणेंविरुद्ध चार पोलिस ठाण्यांत, तर गीता जैन यांच्याविरुद्ध तीन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर अशा विविध ठिकाणी भडकावू विधाने करत धार्मिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. याचा लोकसभा निवडणूक काळात विपरीत परिणाम होऊ शकतो, धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने संबंधित आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका खार येथील शिक्षिका अफताब सिद्दिकी व अन्य रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी खंडपीठाने कठोर भूमिका घेत कायदा मोडण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यांची गय करू नका. तातडीने कारवाई करा, असा आदेश देताना मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या पोलिस आयुक्तांना नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्या भाषणांच्या रेकॉर्डिंगचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील अ‍ॅड.हितेन वेणेगावकर यांनी पोलिस आयुक्तांनी आक्षेपार्ह, भडकावू भाषणांचे रेकॉर्डिंग तपासल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे तसेच गीता जैन यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम 153 सह अन्य कलमांतंर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news