मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली असून, हातकणंगलेत सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहेे.
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी या मतदारसंघात ठाकरेंनी करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. या चार उमेदवारांमध्ये शिवसेनेने यंदा दोन महिलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, तर दुसरीकडे हातकणंगले येथून राजू शेट्टी यांना पाठिंबा न देता शिवसेनेने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. शेट्टी यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने हातकणंगलेत माजी आमदार सत्यजित पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.
उन्मेष पाटील, करण पवार यांच्या पक्षप्रवेशावेळी पत्रकारांशी बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात महिला उमेदवार उतरविण्याची खेळी खेळली आहे. दरेकर या 2009 पूर्वी शिवसेनेत होत्या. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश करीत 2009 ची लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. परंतु, मनसेत कोंडी होऊ लागल्याने त्या पक्षातून बाहेर पडून शिवसेनेत दाखल झाल्या. शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राहणे पसंत केले. उत्तम वक्ता आणि आक्रमक चेहरा म्हणून कल्याणमध्ये त्यांची ओळख आहे.
भारती कामडी या पालघर जिल्हा परिषदेवर दोनवेळा निवडून आल्या असून, त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कामडी यांच्याकडे ठाकरे गटाचे महिला लोकसभा संघटकपद असून, त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच राहिल्या होत्या.
जळगावमधून करण पवार यांना लोकसभेची लॉटरी लागली आहे. विविध सर्वेक्षणांमध्ये उन्मेष पाटील यांची पुन्हा निवडून येण्याबाबत खात्री वाटत नसल्याने त्यांच्याऐवजी त्यांनीच शिफारस केलेल्या करण पवार यांना संधी देण्यात आल्याचे कळते. पवार हे पारोळा येथील माजी नगराध्यक्ष असून, बुधवारी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली. पवार हे उन्मेश पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. करण पवार हे राष्ट्रवादीत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.
हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे पाठिंबा मागितला होता. शेट्टी यांनी दोनवेळा 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. मात्र, 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठाकरेंनी दिला. परंतु, शेट्टी यांनी त्यास नकार दिल्याने शिवसेनेने हातकणंगलेतून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित केली. पाटील हे पूर्वी शिवसेनेतून शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, 2019 च्या निवडणुकीत त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी त्यांचा पराभव केला होता.