पुढील पाच वर्षात पीएम मोदींच्या नेतृत्वात महान भारताची रचना : अमित शहा यांची घोषणा

पुढील पाच वर्षात पीएम मोदींच्या नेतृत्वात महान भारताची रचना : अमित शहा यांची घोषणा

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० वर्षांचा कार्यकाळ कॉंग्रेसने खोदलेले खड्डे भरण्यात गेला. पुढील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महान भारताची रचना करण्याचे काम सुरू होणार असून २०४७ मध्ये महान भारताची रचना होणार असल्याची घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

ते भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महायुतीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारसभेत आज (दि.१४) बोलत होते. गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर जोरदार प्रहार करताना सांगितले की, कॉंग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन मत मागितले जाते. पण याच कॉंग्रेसने सन १९५४ च्या भंडारा लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्याचे काम केले. पाच दशकानंतरही कॉंग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. व्हि.पी. सिंग यांच्या कार्यकाळात भाजपच्या सहकार्यातून डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न दिला गेला. भाजपला ४०० च्या वर जागा मिळाल्यास आरक्षण संपेल, असा भ्रम कॉंग्रेसकडून पसरविला जात आहे. परंतु, दोनदा बहुमत असतानाही भाजपने त्याचा गैरफायदा आरक्षण संपविण्यासाठी केला नाही. बहुमताचा फायदा आम्ही कलम ३७० हटविण्यास आणि तिहेरी तलाक समाप्त करण्यासाठी केला. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष राजकारणात आहे तोपर्यंत आरक्षण संपणार नाही आणि आम्ही संपवू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

आज अयोध्या येथे राममंदिर पूर्णत्वास आले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. पण कॉंग्रेसने त्यांच्या कार्यकाळात राम मंदिर बनू दिले नाही. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केले आणि भगवान रामाची प्राणप्रतिष्ठाही झाली. येत्या रामनवमीला ५०० वर्षांनंतर रामलल्ला आपला वाढदिवस अयोध्या येथे साजरा करतील. राहूल गांधी यांनी आपल्या जाहिरनाम्यात गरीबी हटावचा नारा दिला आहे. परंतु, तो नारा इंदिरा गांधी यांच्या काळातील आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ८० कोटी गरीबांना मोफत राशन दिले. १२ कोटी घरांमध्ये शौचालय दिले. ४ कोटी गरीबांना घरे दिली. १० कोटी लाभार्थ्यांना उज्वला सिलिंडर दिले. आता लवकरच पाईपलाईनच्या माध्यमातून  घराघरात गॅस दिले जाणार आहे. या सर्व योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने राबविल्या आहेत.

कॉंग्रेसच्या काळात कृषी कल्याण विभागासाठी २२ हजार कोटींची तरतूद होती. परंतु, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०२२-२३ मध्ये एक लाख २५ हजार कोटींची तरतूद करुन कृषी क्षेत्राला मजबुत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज देशात ८३० लाख मेट्रीक टन धानाची खरेदी होते. तिसºयांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर समान नागरिक संहिता आणली जाणार, वारंवार निवडणुका न घेता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार, पेपर लिक करण्यांविरोधात कठोर कायदा आणणार, ७० वर्षांवरील वृद्धांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवेचा लाभ देणार, विजेचे बिल शुन्यावर आणणार, आदी कामांचा समावेश आपल्या संकल्पपत्रात केल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रभारी आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, खा. प्रफुल पटेल, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, आमदार विनोद अग्रवाल, माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी राज्यमंत्री परिणय फुके, डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, माजी आमदार बाळा काशीवार आदी उपस्थित होते.

तीन वर्षात नक्षलवाद संपुष्टात आणणार

कॉंग्रेसच्या काळात नेहमीच पाकीस्तानातून आलेले दहशतवादी हल्ला करीत होते. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन पाकीस्तानला भाजपने उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात देशाला सुरक्षित आणि समृद्ध केले. महाराष्ट्र, ओरिसा, तेलंगणा, बिहार, झारखंड येथील नक्षलवाद समाप्त केले. पुढील तीन वर्षात छत्तीसगडमधील देखील नक्षलवाद समाप्त करु, असे अमित शहा म्हणाले.

आम्ही कुणाचाही पक्ष फोडला नाही

उद्धव ठाकरे म्हणतात भाजपने आमचा पक्ष फोडला. शरद पवार म्हणतात भाजपने आमचा पक्ष फोडला. पण भाजपने कुणाचाही पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहाने शिवसेना फोडली. तर शरद पवार यांच्या पुत्रीमोहाने राष्ट्रवादी फोडली, असे सांगत अर्धी शिवसेना आणि अर्ध्या राष्ट्रवादीने संपूर्ण कॉंग्रेसला अर्धे केल्याचे अमित शहा म्हणाले. आता या तीन अर्ध्या पार्ट्या महाराष्ट्राचे भले कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे भले फक्त भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात, असा विश्वासही त्यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news