बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : येथील प्रतिष्ठित नऊ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी शुक्रवारी सकाळी देण्यात आली. यामुळे पोलिसांनी तातडीने संबंधित शाळांमध्ये बॉम्ब निकामी पथकासह तपास केला. कोणत्याही ठिकाणी स्फोटके आढळले नसल्याने बॉम्बची अफवा पसरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
सकाळी 11च्या दरम्यान शाळांना निनावी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. शाळांमध्ये शक्तिशाली बॉम्ब ठेवण्यात आला आहे. बॉम्बस्फोट झाल्यास शेकडो जणांचा जीव जाऊ शकतो. हा विनोद नाही. गांभीर्याने तपास करावा. पोलिसांना कळवावे. कोणताही विलंब करू नये. केवळ काही क्षणच आता राहिल्याचे ई-मेलमध्ये कळवण्यात आले होते.
शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसह शाळांमधील कर्मचारी शाळेबाहेर पळत सुटले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने तपास केला. बॉम्ब निकामी पथकाने सर्वत्र तपास केला तरी कोणत्याही ठिकाणी स्फोटके सापडले नाहीत. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबतचे वृत्त काही मिनिटांतच व्हायरल झाले. यामुळे पालकांनी शाळांमध्ये गर्दी केली.
दिल्ली पब्लिक स्कूल वर्तूर, गोपालन इंटरनॅशनल स्कूल, न्यू अॅकॅडमी स्कूल, सेंट व्हिन्सेंट पॉल स्कूल, इंडियन पब्लिक स्कूल गोविंदपूर, इबेन्झर इंटरनॅशनल स्कूल इलेक्ट्रॉनिक सिटी यासह नऊ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ई-मेलमध्ये म्हटले होते.
शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. याद्वारे राज्यातील शांतता बिघवडण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
– बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री, कर्नाटकशाळांमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर तातडीने तपास करण्यात आला. कोणत्याही ठिकाणी स्फोटके सापडली नाहीत. सायबर पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.
– कमल पंत, पोलिस आयुक्त, बंगळूर शहर