Boat drowns : भर समुद्रात गुजरातच्या नौकेला जलसमाधी, सख्ख्या भावांचा मृत्यू, एक खलाशी बेपत्ता; चौघांना वाचविण्यात यश

Boat drowns : भर समुद्रात गुजरातच्या नौकेला जलसमाधी, सख्ख्या भावांचा मृत्यू, एक खलाशी बेपत्ता; चौघांना वाचविण्यात यश
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : Boat drowns : खवळलेल्या समुद्रात गुजरातमधील तलासरी येथील 'रत्नसागर' मच्छीमारी नौकेला भगदाड पडून पाणी घुसल्याने नौका उलटून झालेल्या अपघातात तीन खलाशी बुडाले तर चौघांचे दैवबलवत्तर म्हणून दोरी हाती लागल्याने, त्यांना आपला जीव वाचवण्यात यश आले. बुडालेल्या तिघांपैकी दोन सख्ख्या भावांचे मृतदेह हाती लागले असून एक जण अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्घटना रत्नागिरीपासून ९५ वाव समुद्रात घडली. बुधवारी दुपारी मृतदेहांसह बचावलेल्या चौघांना घेऊन तलासरीतील तीन नौका तटरक्षक दलाच्या पथकासह रत्नागिरीतील मिरकरवाडा दाखल झाल्या. बेपत्ता असलेल्या एका खलाशाचा तटरक्षक दलाकडून शोध सुरु ठेवण्यात आला आहे.

Boat drowns : तलासरी येथील रत्नसागर, गदाधर, कुणकेश्वरी २, कपीध्वज या चार नौका ९५ वाव समुद्रात मासेमारी करीत होत्या. मंगळुरू त्या पुन्हा तलासरीच्या दिशेने जात असताना, रत्नागिरीपासून खोल समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने, या नौकांनी नांगर टाकला होता. यातील रत्नसागर नौकेतील खलाशीही रात्री ८ वाजल्यानंतर जेवून खवळलेला समुद्र शांत होण्याची वाट पाहत बसले होते. मध्यरात्री लाटांच्या माऱ्यामुळे नौकेच्या मध्यभागातील फळीचा एक खिळा निखळल्याने भगदाड पडून पाणी आत घुसले. खलाशांना काही समजण्यापूर्वीच नौका कलंडू लागली. त्यावेळी नौकेच्या डेकवर बसलेल्या खलाशांनी ओरडून केबीनमधील तांडेल व अन्य खलाशांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वजण नौकेच्या बाहेर पडण्यापूर्वीच नौका पाण्यात उलटी झाली.

Boat drowns : यावेळी डेकवरील कल्पेश लहाने भंडार (३०, रा. तलासरी), दीपक भिखार वळवी (३८, रा. तलासरी), अंतोल देवल्या भगत (३२, ) जयवंत जंत्र्या खरपडे (५०, तलासरी), हे पाण्यात फेकले गेले. त्यांनी नौकेवरील दोर पकडून काही काळ पाण्यात लटकत राहिले. त्यानंतर उलट्या झालेल्या नौकेवर चढून आपला जीव वाचवला. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या नौकांना ओरडून बचावासाठी प्रयत्न केला.

Boat drowns : त्यानंतर अपघाताची घटना तटरक्षक दलाच्या मुंबईतील नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर रत्नागिरीला कळवण्यात आले. रत्नागिरी व जयगड बंदरात असणाऱ्या नौकांना त्यानंतर लागलीच घटनास्थळाकडे कुच केली. सकाळी हेलिकॉप्टरही मदतीसाठी व शोध घेण्यासाठी रवाना झाले. अपघातग्रस्त रत्नसागरमधील लक्ष्मण भिखार वळवी (४२) व सुरेश भिखार वळवी (४५, दोघेही तलासरी) या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह सकाळी दिसून आल्यावर अन्य नौकांमधील खलाशांनी त्यांना बाहेर काढले. यातील मधुकर चैत्या खटल ४५, तलासरी हा खलाशी बेपत्ता आहे. घटना घडली त्यावेळी मधुकर हा केबीनच्या खाली असणाऱ्या जागेमध्ये झोपला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नसावे अशी शक्यता बचावलेल्या खलाशांनी व्यक्त केली. यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी जीवन सावंत व तृप्ती जाधव व अन्य कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहा. पोलीस निरीक्षक मनोज भोसले हे पोलीस पथकासह उपस्थित होते.

अपघातग्रस्त नौकेपासून जवळ असणाऱ्या गदाधर या नौकेतील खलाशांनी या बुडालेल्या नौकेवरील चौघांनाही आपल्या नौकेवर घेतले. हा प्रकार पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. यानंतर गदाधर नौकेवरील खलाशांनी अपघाताची माहिती आपल्या मालकांना दिली.

Boat drowns : मृतदेह रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात…
तटरक्षक दलाच्या पथकाने बचावलेल्या चौघांसह तलासरी येथील तीनही नौका व दोन मृतदेह घेऊन दुपारी ३ वा. मिरकरवाडा बंदर गाठले. त्यानंतर मृतदेह व बचावलेल्या चौघांनाही रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news