P-20 Conference : पी – २० परिषदेत लोकसभाध्यक्षांच्या द्विपक्षीय बैठका

P-20 Conference : पी – २० परिषदेत लोकसभाध्यक्षांच्या द्विपक्षीय बैठका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि रशिया संकटाच्या व अडचणीच्या काळात नेहमीच एकमेकांसोबत ठामपणे उभे असून हे नाते उभय देशांच्या धोरणातून दिसते, असे प्रतिपादन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी रशियन संसदेचे अध्यक्ष वेलेंटिना मेटविनको यांच्या समवेत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान केले.

जी-२० देशांच्या संसद प्रमुखांचे संमेलन असलेल्या पी-२० परिषदेच्या निमित्ताने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज रशियासह अन्य देशांच्या संसद प्रमुखांसमवेत द्विपक्षीय चर्चा केली. रशियन संसद प्रमुखांसमवेत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान लोकसभाध्यक्षांनी पी-२० च्या यशासाठी रशियाच्या सहकार्याबद्दल आभार मानताना भारत आणि रशियाच्या प्रगाढ संबंधांना उजाळा दिला. संकट आणि अडचणीच्याकाळात उभय देश एकमेकांसोबत उभे राहिले असून हे दीर्घकालीन नाते दोन्ही देशांच्या धोरणातून तसेच उपक्रमांमधूनही दिसते, असे प्रतिपादन लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी यावेळी केले. सैन्य, खाद्यान्न, पेट्रोलियम, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांचे घनिष्ठ सहकार्य असल्याचेही ते म्हणाले. तर, पी-२० च्या यशस्वी आयोजनाबद्दल वेलेंटिना मेटविनको यांनी लोकसभाध्यक्षांची प्रशंसा केली. चंद्रयान मोहिमेच्या ऐतिहासिक यशाबद्दल भारताचे अभिनंदन करताना नवीन संसद भवन भारतीय लोकशाहीचे प्रतिबिंब असल्याचेही रशियन संसद प्रमुख म्हणाले. पुढील वर्षी ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे असून त्यादरम्यान होणाऱ्या संसदीय संमेलनासाठी लोकसभाध्यक्ष बिर्ला यांना वेलेंटिना मेटविनको यांनी निमंत्रण दिले.

तत्पूर्वी, काल लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी दक्षिण कोरियाच्या नॅशनल एसेंब्लीचे स्पिकर किम जिन–प्यो यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात उभय देशांच्या राजनितीक संबंधांना ५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, संस्कृति यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संबंधांवर बातचित झाली. त्यानंतर आंतरसंसदीय संघाचे (आयपीयू) अध्यक्ष दुआर्ते पशेको यांच्यासमवेतही लोकसभाध्यक्षांनी चर्चा केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news