बेळगावात काळा दिनाला निघालेल्‍या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले
शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

कागल; पुढारी वृत्तसेवा कर्नाटक राज्यामध्ये मराठी भाषिकांच्या वतीने १ नाेव्हेंबर हा काळा दिन पाळण्यात येत आहे. या दिनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय देवणे व पदाधिकारी कर्नाटक राज्यामध्ये जात होते. यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कागल दूधगंगा नदीवर त्यांना अडवण्यात आले. यावेळी पोलीस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात चांगलीच झटापट झाली. यानंतर कर्नाटक राज्यामध्ये जाऊ दिले जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गावरच ठिया आंदोलन सुरू केले. यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.

यावेळी विजय देवणे यांनी कर्नाटक शासनाचा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही निषेध केला. यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. कागल पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक पाऊण तास विस्कळीत झाली होती. दूधगंगा नदीवर दोन्ही राज्याच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, कर्नाटक राज्यामध्ये सरकार कोणाचेही असू दे, मराठी भाषिकांवर दडपशाही केली जाते. सीमेवर अडवलं तरी अन्य मार्गाने कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा समन्वय मंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन मराठी भाषिकांना दिलासा देण्याची गरज होती, मात्र कोणीही मंत्री फिरकला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी भाषिकांबद्दल असलेले प्रेम बेगडी आहे. कर्नाटकातील भाजप प्रणित कन्नडवेधीकेच्या संघटनेला ध्वज लावण्यासाठी परवानगी दिली जाते. मग महाराष्ट्र एकीकरण समितीला का दिली जात नाही, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news