गेवराई; पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यात वाळू माफियांना सळो की पळो करून सोडणारे पोलीस अधिक्षक पथक प्रमुख, सपोनि गणेश मुंडे व एका पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. ही खळबळजनक घटना आज (बुधवार) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. एसपींच्या पथकावरच थेट असा हल्ला करण्यात आल्यामुळे वाळू माफियांचा मुजोरपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आज पहाटे गणेश मुंडे व पोलीस कर्मचारी वायबसे हे गेवराई तालुक्यातील म्हाळसपिपंळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून राक्षसभुवनकडे जात होते. यावेळी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची स्कर्पिओ बिनानंबरची थांबलेली होती. सदर गाडी गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. राक्षसभुवन फाट्यावर मुंडे यांनी त्या स्कर्पिओला हात दाखवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता, त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीने दिलेल्या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे.
सदर प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याची माहिती असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे कळते. दरम्यान गणेश मुंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. माफियांचा मुजोरपणा मोडीत काढणे आता पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे. तसेच रात्री उशीरा पाडळशिंगी जवळ एक हायवाचा अपघात झाला व तो हायवा कुनाचा? याची चौकशी देखील पोलिस अधीक्षक यांनी करावी अशी मागणी होत आहे.