सावधान..! महाराष्ट्रातील उष्णतेबाबत हवामानतज्ज्ञांचा काळजी वाढविणारा अंदाज..

सावधान..! महाराष्ट्रातील उष्णतेबाबत हवामानतज्ज्ञांचा काळजी वाढविणारा अंदाज..

पुणे : अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा उन्हाळा खरोखरीच तीव्र आहे. त्याची झलक मार्च महिन्यातच दिसली असून, आगामी 60 दिवस राज्यात उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. मार्चमध्येच लाटा तीव्र झाल्याने समुद्राचे पाणीही यंदा लवकर तापल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा मुक्काम होता. त्यामुळे उन्हाचा चटका कमी जाणवेल, असा अंदाज होता. मात्र, मार्चच्या दुसर्‍या आठवड्यातच राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली. पारा 38 ते 40 अंशांवर गेला. मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात ही लाट अधिक  तीव्र झाल्याने सध्या महाराष्ट्राचा पारा देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही 24 ते 32 टक्के इतका झाला असून, समुद्राचे पाणी लवकर तापले आहे.

अल निनोमुळे कडक उन्हाळा

यंदा अल निनो स्थिती मेअखेरपर्यंत सक्रिय राहणार असल्याने कडक उन्हाळ्याचा अंदाज हवमान विभागाने दिला होता. ते भाकीत तंतोतंत खरे ठरले. मार्च महिन्यात देशात सर्वांत कमी पाऊस झाला. मार्चमध्ये देशात 24 ते 26 मिमी पाऊस होतो. मात्र, केवळ 19 ते 21 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्वोत्तर भारतातच सरासरी इतका पाऊस झाला. राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांत सरासरीपेक्षा 60 टक्के कमी पाऊस झाला आहे.

  • भारतातील सर्व राज्यांचे कमाल तापमान मार्चमध्ये 41 ते 45 अंशांवर गेले. दरवर्षी एप्रिल आणि मेमध्ये अशी स्थिती असते.
  • मात्र, यंदा पारा भरदुपारी 44 ते 45 अंशांवर कसा गेला होता, हे या नकाशात दिसत आहे. 28 मार्च रोजी देश असा उष्णतेने धगधगलेला होता.

किमान तापमानाची कमाल उडी

किमान तापमानात यंदा राज्यात मोठी वाढ झाली असून, पारा 26 ते 28 अंशांवर गेला आहे. कोकण, विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र जास्त तापला आहे. कारण, कमी दाबाचा पट्टा सतत विदर्भात तयार होत आहे. त्यामुळे मार्चमध्ये त्या भागात पाऊस झाल्याने उष्णतेची लाट असूनही दाह कमी आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र अन् मध्य महाराष्ट्र यंदा मार्चमध्ये चांगलाच होरपळून निघत आहे.

सर्वांत तीव्र लाट महाराष्ट्रात

मार्चमध्ये दुपारी 1 ते 3 या वेळेत देशात सर्वाधिक तीव्र उष्णतेची लाट महाराष्ट्रात आहे. तापमानाचा पारा भर दुपारी मार्चमध्ये प्रथमच 44 ते 45 अंशांवर गेला. तीच परिस्थिती एप्रिल व मेमध्ये राहणार असल्याचा अंदाज देशी आणि विदेशी हवामान संस्थांनी दिला आहे. मार्च महिन्यात 15 ते 20 आणि 21 ते 29 मार्चदरम्यान दोन मोठ्या उष्णतेच्या लाटांनी प्रचंड उष्मा तयार झाला. आता एप्रिल व मेमध्ये कमाल तापमानाचा पारा 41 ते 44 अंशांवर जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कमाल तापमान यंदा वाढणार आहे. याचा अंदाज हवामान विभागाने खूप आधी दिला होता. कारण, अल निनो स्थिती मेअखेरपर्यंत कायम आहे. मार्चमध्ये यंदा राज्यात खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतामान जास्त जाणवत आहे. भर दुपारी रिअल टाईममध्ये पारा 44 ते 45 अंशांवर जाण्याचे हे एक मुख्य कारण आहे. एप्रिल व मेमध्येही तापमान जास्त राहील. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी.

– अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news