नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत विरोधक संभ्रम निर्माण करीत आहेत. आमच्या पक्षात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षातून आता आम्ही सत्तेत आलो. डबल इंजिनचे सरकार आता अधिक मजबुतीने पुढे जाणार आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
राष्ट्पतींच्या कोराडी येथील कार्यक्रमानंतर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीला आल्याने राजकीय चर्चा रंगली. मात्र, संघटनात्मक बाबतीत आम्ही नेहमीच भेटतो, दिल्लीला जाणार नसल्याचे स्पष्ट करीत फडणवीस यांनी गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर, मित्रपक्षातील राजी-नाराजींवर बोलणे टाळले. बावनकुळे यावेळी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आम्हाला जनादेश मिळाला होता. मात्र, फडणवीस एक पाऊल मागे आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. आता किंतु परंतु करण्याचे काम नाही. आज जागा वाटपाचा प्रश्नच नाही, जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा जागा वाटपावर चर्चा होईल आज कुठलीही चर्चा नाही. असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत 45 तर विधानसभा निवडणुकीत दोनशेवर जागा मिळविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कामाला लागलो आहेत. महायुती भक्कम आहे, संभ्रमापासून दुर राहिले पाहिजे असा सबुरीचा सल्ला सहकाऱ्यांना दिला. लवकरच तीनही नेते बसून मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरवतील असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्यासंदर्भात अजित दादा यांनी सारे काही सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नुकसान झाले तरी खोटं बोलत नाहीत. आम्ही नैसर्गिक युती केली, आता किंतु परंतुची गरज नाही, राज्यात स्थिर सरकार आहे, डबल इंजिन पुन्हा अधिक स्थिर सरकार झाले आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सक्षम सरकार आहे. मुळात आम्ही सोबत घेतलेले नाही, अजित दादा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्यासाठी सत्तेत आले आहेत. महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्यासाठी एकत्र आले आहेत. राष्ट्र हिताकरिता आम्ही काम करत आहोत. कर्तृत्ववान कार्यकर्ते असलेले अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. जेवढे लोक 2024 च्या महायज्ञात मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुढे येतील त्यांचे स्वागत आहे .आमच्यात तोडण्याचे संस्कार नाही यावर भर दिला.