बच्चू कडूंचा मंत्रिपदावरील दावा सोडण्याचा निर्णय | Bachchu Kadu on Ministry

बच्चू कडूंचा मंत्रिपदावरील दावा सोडण्याचा निर्णय | Bachchu Kadu on Ministry
Published on
Updated on
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला हजर राहण्यासाठी राजधानी दिल्लीत आलेले माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदवरील दावा सोडत असल्याचे जाहीर केले.
मंत्रिमंडळाचा विस्‍तार बराच लांबला आहे. मंत्रिपदासाठी अनेकजण इच्‍छूक आहेत. त्‍यामुळे ओढाताण होत आहे. मंत्रिमंडळात तुम्‍ही हवे आहात, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्‍याला सांगितले. परंतु, मी त्‍यांची अडचण समजू शकतो. त्‍यामुळे आपण मंत्रीपदावरील दावा सोडण्‍याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.
एनडीए बैठकीच्या निमंत्रणाचा आदर राखून आपण बैठकीला हजर राहण्‍याचा निर्णय घेतला. परंतु, एनडीएमध्‍ये सामील होण्‍याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.यासंदर्भात चर्चा केली जाईल, त्‍यानंतर ठरवू, असेही कडू यांनी स्पष्ट केले.
अमरावतीसह चार ते पाच जिल्‍ह्यांमध्‍ये प्रहार जनशक्‍ती पक्ष मजबूत आहे. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्‍छा आहे. आपण स्‍वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. फार कमी मतांनी पराभव झाला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्‍या जागा वाटपासंदर्भात मुख्‍यमंत्र्यांसोबतच चर्चा केली जाईल. आपण भाजपचे थेट मित्र नाही, तर भाजपचे मित्र असलेल्‍या एकनाथ शिंदे यांचे मित्र आहोत, असेही कडू म्हणाले.
काही गोष्टींचा अतिरेक केला की परिणाम भोगावा लागतो.तो व्हीडिओ मी पाहिलेला नाही. कुणाच्या वैयक्तिक जीवनात घुसू नये, असे मला वाटते.परंतु, जसे तुम्ही समोर जाता. लोकांसोबत बोलता तसेच पुन्हा तुमच्या सोबत होते. सध्या राजकारणात द्वेषाने राजकारण केले जातेय.परंतु, तसे होता कामा नये, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हीडिओ संबंधी बोलतांना ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news