Bacchu Kadu : रवी राणांनी धार्मिकतेला ठेच पोहोचवत आचारसंहिता भंग केली; बच्चू कडूंचा आरोप

Bacchu Kadu: बच्चू कडू
Bacchu Kadu: बच्चू कडू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आमदार रवी राणा यांनी निवडणुकीच्या काळात धार्मिकतेला ठेच पोहोचवत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यासह आमदार कडू यांची बदनामी केल्यामुळे तिघांवर त्यांनी 25 कोटींचा मानहानीचा दावा देखील ठोकला आहे. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी आज (दि.२५)  माध्यमांशी बोलताना दिली.

रवी राणा यांनी भर निवडणुकीच्या काळात धार्मिकतेला ठेच पोहचवली आणि आचारसंहितेचा सुद्धा भंग केला आहे. आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या रॅलीत एक-एक हजार रुपये वाटले. हा व्यवहार व्हायला लागला तर धार्मिकता संपून जाईल. यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, असे बच्चू कडू म्हणाले. जिल्हाधिकारी यांनी तक्रार पोलिसांकडे पाठविली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या विरोधात गरज पडली तर आम्ही कोर्टात जाऊ असे देखील कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू पुढे म्हणाले, माझी बदनामी केली त्यामुळे तिघांवर प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. एकाची नोटीस देखील पूर्ण झाली आहे, आणि एकाला तारीख सुद्धा भेटली आहे. आता दोघांवर बाकी आहे. त्यांना सुद्धा आम्ही कोर्टात खेचू. ज्यांनी आमच्याबद्दल नको त्या गोष्टी बोलल्या आहेत, त्यामध्ये दोन अधिकारी सुद्धा आहेत. सगळ्यांना आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावू, आम्ही आमचा दावा यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच ऐन वेळेवर सायन्स कोर मैदानाची परवानगी नाकारल्यामुळे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील आम्ही कोर्टात खेचू, असे बच्चू कडू म्हणाले.

दि. 23 आणि 24 एप्रिल रोजी बच्चू कडू यांच्या प्रहार समर्थित उमेदवारासाठी सायन्स कोर मैदान बुक करण्यात आले होते. मात्र ऐन वेळेवर ते भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेण्यासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आले होते. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, आता बच्चू कडू यांनी या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहीरनाम्यानुसार कोणीच काम करत नाही : 

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यावर आमदार कडू प्रतिक्रिया देत म्हणाले की, जाहीरनाम्यानुसार कोणीच काम करत नाही. आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजपा जाहीरनाम्यानुसार त्यांनी कामं केली नाही. त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काहीही महत्व उरलेलं नाही. बच्चू कडू पुढे म्हणाले की, भाजपने 2014 आणि 2019 मध्ये जाहीरनाम्यात आश्वासने दिली ती पूर्ण झाली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करू, असे जाहीरनाम्यात घोषित केले होते. मात्र भाजपने देखील जाहीरनाम्यानुसार आपले वचन पूर्ण केले नाही. मतदार देखील जाहीरनामा वाचून मतदान करत नाही, आधी वचननामा-जाहीरनाम्याला महत्त्व होतं. मात्र आता तो काळ गेला आहे. शंभर पैकी एखादा व्यक्ती जाहीरनामा बघतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news