मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात दुसर्या टप्प्यात विदर्भातील 5 आणि मराठवाड्यातील 3 अशा 8 लोकसभा मतदारसंघांमधील प्रचार तोफा थंडावल्या असून 26 एप्रिल रोजी या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर हे रिंगणात उतरलेले अनुक्रमे अकोला व अमरावती, भावना गवळींना उमेदवारी नाकारल्याने यवतमाळ-वाशीम मतदारसंघ, नवनीत राणांमुळे अमरावती, महादेव जानकर व बंडू जाधव यांच्यामुळे परभणी मतदारसंघ तसेच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड मतदारसंघांमधील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
या दुसर्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार रिंगणात असले तरी अकोला येथील लढतीचा अपवाद वगळता बहुसंख्य मतदारसंघांमध्ये ही लढत थेट महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशीच आहे. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचे अभय पाटील व भाजपच्या विद्यमान खासदारांचे पुत्र अनूप धोत्रे यांचा सामना करावा लागत आहे.
बुधवारी या मतदारसंघांमध्ये प्रचार संपला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा प्रचार सामना बघायला मिळाला. अमरावती व अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी अमरावतीत बुधवारी प्रचार सभा घेतल्या.