गोंदिया ; पुढारी वृत्तसेवा : घरात झोपलेल्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करून अज्ञातांनी धारदार हत्याराने गळा व छातीवर वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना आहे. ही घटना जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथे गुरुवार ( दि. २) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ढिवरू इसन इळपा (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर लग्नाचा आशिर्वाद समारंभ असताना सदर हत्याकांडाची कुणालाही भनक लागली नसल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढिवरू याचा मुलगा हा नागपूर बुट्टीबोरी येथे राहत असून त्याची पत्नी सडक अर्जुनी तालुक्यातील मुंढरीटोला येथे नातेवाईकांकडे लग्नकार्यात गेली होती. तर घटनेच्यावेळी ढिवरु व त्याची आई सरस्वताबाई इळपाचे (वय ७५) हे दोघेही दार उघडे ठेवून घरी झोपले होते. त्यातच घराशेजारील बळीराम मोहनकर यांच्या नातवाच्या लग्नाचे आशिर्वाद समारंभाचे कार्यक्रम असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्हाड्यांची ये-जा तेथे होती.
याच दरम्यान काही अज्ञात आरोपींनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून ढिवरूच्या गळा व छातीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. त्याच्या आईच्या सांगण्यानुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास ती झोपेतून उठल्यानंतर तिला दारात ढिवरुचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तिने या प्रकाराविषयी शेजारील असेलल्या पुतण्याला सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास ठाणेदार अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
घटनेच्या रात्री मृताच्या घराशेजारीच लग्नाचे आशिर्वाद समारंभ असल्याने रात्री उशिरापर्यंत वऱ्हाड्यांची रेलचेल होती. तर सर्वत्र आनंद पसरलेला होता. अशात दुसरीकडे हा थरार घडून आला. मात्र, कुणाला याची साधी भणकही लागली नाही. तर सकाळी या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली.
मृत ढिवरु हा गावात किरकोळ अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती आहे. असे असले तरी गावात त्याचे कुणाशीही वैर नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तर कुटुंबातही सर्वकाही व्यवस्थित होते. तेव्हा एवढ्या निर्दयतेने त्याचा खून कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमका कोणत्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली? एवढ्या वऱ्हाड्यांच्या रेलचेल असूनही आरोपींनी हा हत्याकांड कसा घडवून आणला असावा ? असे अनेक प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाले आहेत.