नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२६ ) आम आदमी पक्षाने दिली. आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी याविषयी माहीती दिली. तसेच पक्षाने सोशल मीडियावर याविषयीच्या पोस्टही केल्या आहेत. त्यानुसार पुढील दोन दिवसात सुनिता केजरीवाल राजधानी दिल्लीत रोड शो करणार आहेत तसेच देशभर प्रचार दौराही करणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल राजकीय पटलावर सक्रीय झाल्या आहेत. आता त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीसह देशभरातील प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे. पक्षाने याापुर्वीच त्यांना स्टार प्रचारक म्हणुन जबाबदारी दिली आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत सुनीता केजरीवाल यांच्याविषयी बोलताना मंत्री अतिशी म्हणाल्या की, 'अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि आप उमेदवारांच्या लोकसभा प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. शनिवार (दि. २७ ) रोजी त्या पूर्व दिल्लीत रोड शो कऱणार आहेत. तसेच रविवार (दि.२८) रोजी त्या पश्चिम दिल्लीत रोड शो कऱणार आहेत. तसेच सुनीता केजरीवाल दिल्लीसह पंजाब, हरियाणा, गुजरातमध्येही प्रचारदौरा करणार आहेत.' अशी माहितीही यावेळी मंत्री अतिशी यांनी दिली.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई झाल्यामुळे ते तिहार तुरुंगात आहेत. त्यानंतर सुनीत केजरीवाल राजकारणात पुढे आल्या. त्यांनी अरविंद केजरीवालांचे व्हिडीओ संदेशही जनतेपर्यंत पोहोचवले होते. तसेच त्यांच्या नावाचा समावेश पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही करण्यात आला होता. त्यानंतर आता सुनीता केजरीवाल दिल्लीसह देशभरात रोड शो, प्रचार दौरे करणार असल्याचे पक्षाने सांगितले.