Shiv Jayanti : आग्रा किल्ल्यात घुमणार शिवरायांचा जयघोष!; शिवजयंतीसाठी पुरातत्व विभागाची परवानगी

Shiv Jayanti : आग्रा किल्ल्यात घुमणार शिवरायांचा जयघोष!; शिवजयंतीसाठी पुरातत्व विभागाची परवानगी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) आग्रा किल्ल्यातील दिवाण- ए- आममध्ये साजरी करण्यासाठी अखेर पुरातत्व विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे आग्रा येथे 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयघोष घुमणार आहे. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी (दि.१९) आग्रा किल्ल्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.

जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान तळपला. त्याच ठिकाणी १९ फेब्रुवारीरोजी संध्याकाळी सहा वाजता शिवजयंतीचा (Shiv Jayanti)कार्यक्रम रंगणार आहे. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी पुरातत्व विभागाने प्रारंभी परवानगी नाकारली होती. मात्र, बुधवारी सदर परवानगी देण्यात आली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाण आणि आर. आर. पाटील फाउंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यावेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे.

विनोद पाटील म्हणाले की, जयंती परवानगीसाठी बराच संघर्ष करावा लागला. महाराष्ट्र सरकार सह आयोजक असेल, तर परवानगी द्यायला हरकत नाही, अशी भूमिका दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली होती. त्यावर दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारही सह आयोजक होण्यासाठी तयार झाले. हे सर्व घडत असताना शिवजयंती आग्रामध्येच व्हावी, असा आग्रह सर्व शिवभक्तांचा होता. परवानगी देताना काही अटी टाकण्यात आल्या आहेत, आम्ही या सर्व अटींचे पालन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Shiv Jayanti : १ कोटी तरुण डिजिटल स्वरुपात सहभागी होणार

आग्रा येथे होणाऱ्या शिवजयंती महोत्सवासाठी प्रत्यक्ष तसेच डिजिटल स्वरुपात सुमारे १ कोटी शिवभक्त सहभागी होणार आहेत. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून विमान, रेल्वे तसेच वाहनांमधून सुमारे ४ हजार शिवभक्त आग्रा येथे प्रत्यक्ष शिवजयंती महोत्सवात सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news