Anand Paranjpe : महायुतीतील तणाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा : आनंद परांजपे

Anand Paranjpe : महायुतीतील तणाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा : आनंद परांजपे

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेवरून बोध घेऊन ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले. Anand Paranjpe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव असलेल्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या मृत्यूबाबत विधान करुन 'ध' चा 'मा' करत खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अजित पवार यांच्यावर टीका केली. Anand Paranjpe

राज्यात अनेक आमदार अजित पवारांनी निवडून आणले आहेत. पण आव्हाड यांना आपल्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखत नाही. आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही. मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन टीका करणाऱ्या आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्वेगाने राजीनामा देताना आव्हाड यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता, असा टोला प्रदेश परांजपे यांनी लगावला.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेना व भाजप यांच्यात अंतर्गत धुसफुस असल्याचे या घटनेने उघड केले आहे. ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर व शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडत असते. तर हाच प्रकार मिरा-भाईंदर, नवीमुंबई, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी, ठाणे जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे. महायुतीतील हा तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परांजपे यांनी केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news