अमृता फडणवीस यांची फसवणूक करणारी डिझाईनर अनिक्षा कोण? जाणून घ्या सविस्तर

अमृता फडणवीस यांची फसवणूक करणारी डिझाईनर अनिक्षा कोण? जाणून घ्या सविस्तर

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी देत १ कोटी रूपयांची लाच ऑफर केल्याप्रकरणी उल्हासनगर शहरातून अनिक्षा जयसिंघानी ह्या तरूणीला अटक केली आहे. तिचे वडील अनिल जयसिंघानी अद्या३प पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

अनिक्षा जयसिंघानी या महिला डिझायनरने आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच ऑफर करीत धमकी दिली होती. या प्रकरणी अमृता फडणवीस यांना आरोपींचा कॉल आणि मेसेज आल्यानंतर अमृता यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ अंतर्गत कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मागील दोन दिवसांपासून पोलीस ह्या गुन्ह्याचा तपास करीत होते.

गुरुवारी (दि. १६) सकाळी मलबार हिल पोलिसांचे एक पथक उल्हासनगर शहरात धडकले. उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने कॅम्प २ मधील मायापुरी अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील ७०१ क्रमांकाच्या सदनिकेतून अनिक्षाला ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यावेळी तिच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.

काय आहे प्रकरण ?

अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. आरोपी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना सांगितले होते की, ती कपडे आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मी डिझाईन केलेले कपडे आणि दागिने अमृता यांनी सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती आरोपी अनिक्षा हिने केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षासोबत भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत स्पष्ट केले. पुण्यातील एका कार्यक्रमात अनिक्षा ही अमृता यांना भेटली. कार्यक्रम संपल्यानंतर अनिक्षाला अमृता यांनी कारमध्ये बसवले. तेव्हा अनिक्षाने म्हटले की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत आहेत. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अमृता यांनी अनिक्षाला कारमधून खाली उतरवले. अनिक्षाने तिचे वडील अनिल यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने ते फरार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपये देण्याची तयारी असल्याची विनंती अमृता यांना फोनद्वारे केली होती. यानंतर अमृता यांनी फोन कट करत तिला ब्लॉक केले. तिने पुन्हा अनोळखी नंबरवरून अमृता फडणवीस यांना व्हॉट्सअपवरून व्हिडिओ क्लीप, व्हॉईस नोट्स पाठवले होते. त्यानंतर हा नंबर आरोपी अनिक्षा हिच्या वडिलांचा असल्याची माहिती अमृता यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करीत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी ?

२०१५ मध्ये उल्हासनगरातील कुख्यात क्रिकेट बुकी अनिल जसयसिंघानी याला त्याच्या गोलमैदान परीसरातील घरावर केंद्र शासनाच्या ईडी ह्या विभागाने धाड टाकत ताब्यात घेतले होते. ही धाड आयपीएल क्रिकेट मॅचमधील सट्टा बाजार आणि बेकायदेशीर मनी लॅडरींगशी संबंधित होती. अनिल जयसिंघानी हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा माजी नगरसेवक आहे. मात्र त्यानंतर तो अनेकवेळा लढला, मात्र जिंकू शकला नाही. अनिल जयसिंघानी या फरार आरोपीवर क्रिकेट बेटिंगचे अनेक गंभीर गुन्हे उल्हासनगर व मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मुंबईच्या आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणूक, खोटे दस्तऐवज सादर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर न्यायालयाने उल्हासनगर कॅम्प 2 येथील गोल मैदान परिसरात मोहन लाईफ स्टाईल या इमारतीच्या 1 ल्या मजल्यावर असलेला फ्लॅट 18 ऑक्टोबर 2018 सील केला होता. याच फ्लॅट मध्ये 2019 मध्ये चोरी झाली होती. विशेष म्हणजे त्याचा हा फ्लॅट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news