अमरावती, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याला आरोपीला न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. स्वप्नील दिनकर गेडाम (रा. कैलास नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमरावती येथील ५ वे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस. एस. देशमुख यांच्या न्यायालयाने ४ जानेवारी २०२३ रोजी हा निकाल दिला.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकरण उघडकीस आले होते. प्रज्ञा विवेक मेश्राम (३६, रा. उत्तमनगर, अमरावती) यांना आरोपी स्वप्निल गेडामने नौकरी लावून देतो, अशी बतावणी केली होती. मात्र. नोकरी न लावून देता त्यांच्याकडून ५ लाख घेवून फसवणूक केली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी स्वप्निल गेडामविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अकोला येथे हेड सुपर वायझर या पदावर सरकारी नोकरी करत असल्याची बतावणी केली होती. लोकांना ३ वर्षाच्या करार पद्धतीने नोकरीवर लावून देतो, असे सांगून त्यांची फसवणूक केली होती. ही बाब पोलीस तपासाअंती निष्पन्न झाली.
दरम्यान, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे यांनी आरोपी स्नेहल उर्फ स्वप्नील दिनकर गेडाम याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता आशा ठाकरे यांनी न्यायालयात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सरकारी अभियोक्ता आशा ठाकरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी स्वप्नील दिनकर गेडामला दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि ३० हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.