अमित शहा दुसर्‍यांदा विक्रमी मतांनी विजयी होण्याची चिन्हे

अमित शहा दुसर्‍यांदा विक्रमी मतांनी विजयी होण्याची चिन्हे

गांधीनगर; विशेष प्रतिनिधी : राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून दुसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत. आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये देशाचे गृहमंत्री म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे अमित शहा गांधीनगरमधून पुन्हा विक्रमी मतांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. काँग्रेसने शहा यांच्याविरोधात सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. शहा यांच्यापुढे त्या कितपत आव्हान उभे करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या सोनल पटेल गुजरात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आणि मुंबई व पश्चिम महाराष्ट्राच्या त्या सहप्रमुखही आहेत. अमित शहा यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे चतूरसिंह जावजी चावडा यांचा तब्बल 5 लाख 56 हजार 914 अशा विक्रमी मतांनी पराभव केला होता.

शहा यांना एकूण 8 लाख 94 हजार 624 मते, तर चावडा यांना 3 लाख 37 हजार 61 मते मिळाली होती. बसपाचे उमेदवार जयेंद्र राठोड यांना अवघी 6400 मते मिळाली होती. राठोड यांच्यापेक्षा जास्त सुमारे 10 हजार मते 'नोटा'ला पडली होती. गांधीनगरमध्ये 1989 पासून भाजपच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला असून, तो अजूनही कायम आहे.

भाजपच्या तिकिटावर 1989 मध्ये शंकरसिंह वाघेला निवडून आले होते. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील 1996 मध्ये येथून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी 1998, 1999, 2004, 2009 आणि 2015 अशा लागोपाठ पाच निवडणुकांमध्ये विजय संपादन केला होता. मात्र, 2019 मध्ये वृद्धापकाळमुळे अडवाणी यांना विश्रांती देऊन भाजपने अमित शहा यांना उमेदवारी दिली होती.

शहा यांनी भाजपचा गड राखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून स्थान पटकावले. जम्मू – काश्मीरमधील 370 कलम हटविण्यासह देशात नागरिकत्व कायदा (सीएए) लागू करण्याचे धडाकेबाज निर्णय अमित शहा यांनी घेतले होते. भाजपच्या निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्याची संपूर्ण जबाबदारी शहा यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे गांधीनगरमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर दुसर्‍यांदा मोठा विजय प्राप्त करणे, शहा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी 2014 च्या निवडणुकीत तब्बल 4 लाख हजार 121 मतांनी विजय मिळविला होता. काँग्रेसचे ईश्वरभाई पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता. अडवाणी यांना 7 लाख 73 हजार 539 मते तर पटेल यांना 2 लाख 90 हजार 418 मते मिळाली होती 'आप'चे ऋतुराज मेहता यांना 19 हजार 966 मते मिळाली होती.

गांधीनगरमध्ये राहणारे 79 टक्के लोक शहरातील, तर 21 टक्के ग्रामीण भागातील आहेत. 11. 41 टक्के अनुसूचित जाती, 1.96 टक्के अनुसूचित जमाती, तर 4 टक्के मुस्लिम समाजाची संख्या आहे. या मतदार संघात गांधीनगर- उत्तर घाटलोडिया, साबरमती, कलोल, वेजलपूर, सानंद आणि नारणपुरा या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.
गांधीनगर हा मतदारसंघ 1967 मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यावेळी काँग्रेसचे एस. एम. सोळंकी येथून विजयी झाले होते.

1971 मध्ये ते पुन्हा निवडून आले. 1977 मध्ये ही जागा सर्वसामान्यांसाठी खुली झाल्यावर आणीबाणीच्या काळात भारतीय लोकदलाने ही जागा जिंकली होती. 1980, 1984 मध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र, त्यानंतर भाजपने गांधीनगर काबीज करून आपला गड कायम राखला आहे. या मतदार संघातून आजवर देशाचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, गृहमंत्री राहिलेल्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक लढविल्यामुळे गांधीनगर हा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ ठरलेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news