मविआतर्फे अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार; शरद पवारांच्या उपस्‍थित भरणार अर्ज

अमर काळे
अमर काळे

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवार महाविकास आघाडीतर्फे वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना देण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसऐवजी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या यासाठी विदर्भात येत आहेत.

शरद पवार हे सकाळी 11 वाजता नामांकन अर्ज भरताना स्वतः उपस्थित राहणार आहेत. या विषयीची माहिती माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या निमित्ताने वर्धा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक, पदाधिकाऱ्यांशी संवादातून हा मतदारसंघ पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, किशोर कान्हेरे असे अनेक इच्छुक या मतदारसंघात दावेदार होते. मात्र अलीकडेच माजी आमदार अमर काळे व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक नितेश कराळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी यावरून उत्सुकता होती. अखेर आमदार काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नितेश कराळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट झाले. पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मविआ उमेदवारांसाठी पूर्व विदर्भातील बैठकाचे नियोजन सुरू आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news