यापुढे अ.भा. मराठी साहित्य संमेलन मोठ्या शहरांतच; साहित्य महामंडळाचा निर्णय

मराठी साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलन
Published on
Updated on

ठाणे ः पुढारी वृत्तसेवा : वाचक, साहित्यिकांनी पाठ फिरवल्यामुळे यापुढची मराठी साहित्य संमेलने जिल्हा किंवा मोठ्या शहरांच्या ठिकाणी भरविण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मानसावर पदाधिकार्‍यांनी रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केले.

मुंबई (वांद्रे), देशाची राजकीय राजधानी असलेली दिल्ली आणि देशाचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजीचे आमंत्रण महामंडळाने स्वीकारले आहे. संमेलन स्थळ निवड समिती येत्या जुलै -ऑगस्टमध्ये संमेलनस्थळांची पाहणी करून ऑगस्टमध्ये संमेलनाची घोषणा करणार आहे.

98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी राज्यातून 6 पैकी 3 ठिकाणे गाव, तालुका पातळीवरची असल्याने तिथे अमळनेरच्या संमेलनाप्रमाणे वाचक व साहित्यप्रेमींचा प्रतिसाद न मिळण्याच्या भीतीने तीन आमंत्रणे नाकारण्यात आली. आमंत्रणाबाबत चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची रविवारी मुंबई मराठी साहित्य संघात बैठक झाली. या बैठकीस महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे व महामंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

संमेलनासाठी वांद्रे (मुंबई)च्या नॅशनल लायब्ररी, सरहद (दिल्ली) यांच्यासह इचलकरंजी, धुळे, औंध (कराड), औदुंबर (सांगली) अशी 6 ठिकाणची आमंत्रणे होती.

मुंबईत संमेलन झाल्यास 7 वे संमेलन होईल. मुंबईत यापूर्वी संमेलनाध्यक्ष गंगाधर पटवर्धन (1915), माधव किबे (1926), स्वा. विनायक दामोदर सावरकर(1938), यशवंत पेंढारकर (1950), विश्राम बेडेकर(1988), वसंत बापट(1999) अशी 6 संमेलने झाली आहेत, तर दिल्लीत 1954 मध्ये संमेलन झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत साहित्य संमेलन झाले नाही. यापूर्वीही दिल्लीच्या दिल्ली महाराष्ट्र प्रतिष्ठानने आणि सरहद संस्थेनेच साहित्य संमेलनाची निमंत्रणे दिली होती. इचलकरंजीत 1974 मध्ये पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय 3 वर्षे मुंबई साहित्य संघाकडे आहे. हे महामंडळाचे मुंबईतील तिसरे वर्ष आहे. नंतर कार्यालय हस्तांतरित होईल, त्यामुळे मुंबई तसेच दिल्लीच्या प्रलंबित आमंत्रणाचाही विचार संमेलनासाठी होण्याची शक्यता आहे.

साहित्य संमेलनासाठी येणार्‍या साहित्यिक, वाचक यांना सोयी -सुविधा विशेषतः निवास आणि दळणवळणाच्या सोयी नसल्यास टीका होते. अमळनेरच्या संमेलनातही हाच अनुभव आला. त्यामुळे शक्यतो शहरी भागात संमेलनांचे आयोजन करावी, अशी मागणी होते आहे, या सर्वंकष बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेईल
– डॉ. उज्ज्वला मेहेंदळे ( कार्यवाह, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news