पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. आता नवीन वर्षात अनेक सेलिब्रिटी आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार आहेत. एकीकडे आमिर खानची मुलगी आयराच्या लग्नाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे अभिनेत्री आदिती राव हैदरी ( Aditi Rao Hydari ) हिच्या दुसर्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला आदितीने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. आदिती गेल्या काही दिवसांपासून रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थला डेट करत आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर सिद्धार्थसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यात दोघांमधील जवळीकता स्पष्ट दिसत आहे. आदिती आणि सिद्धार्थच्या या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
यापूर्वी डेटिंगविषयी त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नवीन वर्षात आदितीने सिद्धार्थसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करून रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे लवकरच हे दोघे आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहेत काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आदितीचे पहिले लग्न सत्यदीप नावाच्या व्यक्तीशी झाले होते; पण काही काळानंतर त्यांचे नाते तुटले.